Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:03 IST2025-04-16T19:03:12+5:302025-04-16T19:03:56+5:30

मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय : प्रवेशाबाबत निशिकांत पाटील यांचा मोठा वाटा

Shivajirao Naik will soon join the Ajit Pawar faction of the Nationalist Party in Sangli | Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

विकास शहा

शिराळा : जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा विधानसभा निवडणुकीपासून रंगल्या आहेत. त्यातच मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक हे त्यांच्या भूमिकेची वाटत पाहात होते. यामुळे पहिले आप, पहिले आपच्या नादात पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेत शिवाजीराव नाईक यांनी अजितदादा सक्षम आहेत. त्यामुळे विकासकामे होतील, असे सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाबाबत निर्णय घेतला आहेत. यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे.

आता शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत. शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत त्यांच्याबरोबर जुने मित्र तीन माजी आमदार घेऊन जात आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही बदल होणार आहे. माजी राज्यमंत्री नाईक यांनी १९९५ मध्ये शिवाजीराव देशमुख यांच्याशी फारकत घेऊन फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी युती करून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. यात ते यशस्वी झाले होते. त्यावेळी जिल्ह्यातील अपक्ष आमदार यांची मोट बांधून राज्यमंत्री म्हणून युती शासनात सहभागी झाले होते. 

यानंतर पुन्हा देशमुख गट, भाजप, मानसिंगराव नाईक गट असा राजकीय प्रवास झाला. यादरम्यान शिवाजीराव नाईक यांच्या संस्थाही अडचणीत आल्या होत्या. यातूनच मानसिंगराव व शिवाजीराव नाईक गट एकत्र आला होता. विधानसभा निवडणुकीपासून जयंतराव पाटील, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक यांच्या विविध पक्षात प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र शिवाजीराव नाईक यांनी यात आघाडी घेऊन राज्याची आर्थिक दोरी असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. 

त्यांच्याबरोबर माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार अजितराव घोरपडे हेही बरोबर आहेत. या प्रवेशात निशिकांत पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी ही बैठक घडवून आणली. येत्या आठ-दहा दिवसांत मुंबईत हा प्रवेश होणार आहे. यानंतर सांगली येथे कार्यक्रम होणार असून यामध्ये आणखी अनेक नेते प्रवेश करणार आहेत. आमदार सत्यजित देशमुख, भाजप नेते सम्राट महाडिक यांच्याबरोबर शिवाजीराव नाईक यांची पुन्हा राजकीय वाटचाल कशी असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अजितदादा सक्षम आहेत. त्यांच्याबरोबर जाण्याबाबत या अगोदर बैठका झाल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची तसेच मतदारसंघातील विकासकामे अडणार नाहीत. मानसिंगराव नाईक हे बाहेर आहेत. त्यामुळे ते आल्यावर त्यांना याबाबत सांगणार आहे. मानसिंगराव यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंतराव पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ते काय करणार हे मला सांगता येणार नाही. अजून अनेक नेतेमंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे ही लवकरच समजतील. - शिवाजीराव नाईक, माजी राज्यमंत्री

Web Title: Shivajirao Naik will soon join the Ajit Pawar faction of the Nationalist Party in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.