Sangli Politics: तासगाव तालुक्यात सत्तेतील शिंदेसेना, राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:41 IST2025-09-17T18:40:29+5:302025-09-17T18:41:05+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मोर्चेबांधणी

Shinde Sena in power in Tasgaon taluka Sangli existential challenge for NCP | Sangli Politics: तासगाव तालुक्यात सत्तेतील शिंदेसेना, राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचे आव्हान

Sangli Politics: तासगाव तालुक्यात सत्तेतील शिंदेसेना, राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचे आव्हान

दत्ता पाटील

तासगाव : राज्यात महायुतीचे घटक पक्ष म्हणून सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तासगाव तालुक्यात अस्तित्व दाखवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र हे दोन्ही पक्ष आव्हान कसे पेलणार? यावर तालुक्यातील पक्षाचे भवितव्य ठरणार आहे.

तासगाव तालुक्यात यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती भाजपने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच, घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेदेखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकी वेळी माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीला अच्छे दिन येतील असे दिसत असतानाच, संजय पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा पक्षाचे राज्य सरचिटणीस जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील यांच्या खांद्यावर आहे. तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी उद्धवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे, तत्कालीन तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनीदेखील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांच्या कारभाऱ्यांना तासगाव तालुक्यात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कसब पणाला लावावे लागणार आहे. महायुतीच्या समीकरणावरदेखील निवडणुकीची समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

अजित पवार यांच्या आदेशानुसार तासगाव तालुक्यातसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला आहे. सन्मानजनक तोडगा निघाला तर महायुतीच्या माध्यमातून, अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील. - डॉ. प्रताप पाटील, राज्य सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Shinde Sena in power in Tasgaon taluka Sangli existential challenge for NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.