'बोफोर्सच्या वादळातून राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू बेदखल'; विश्वास पाटलांची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:12 PM2024-04-13T17:12:32+5:302024-04-13T17:17:15+5:30

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत.

sangli lok sabha election Vasantdada Patil, Rajiv Gandhi was remembered by writer Vishwas Patil in a Facebook post | 'बोफोर्सच्या वादळातून राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू बेदखल'; विश्वास पाटलांची पोस्ट व्हायरल

'बोफोर्सच्या वादळातून राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू बेदखल'; विश्वास पाटलांची पोस्ट व्हायरल

महाविकास आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडला. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील ही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काल मिरज येथील तालुका कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आळी असून जिल्हा काँग्रेस कार्यालयावरुन काँग्रेस हा शब्दही हटवण्यात आला आहे. दरम्यान, आता यावर लेखक विश्वास पाटील यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत. विशाल पाटील यांनी आता ही लोकसभा अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. सांगलीतील उमेदवारीच्या वादामुळे सांगलीतील महाविकास आघाडीत अंतर्गत वाद समोर आले आहे. 

विश्वास पाटील यांची फेसबुक पोस्ट काय आहे?

"काल सांगलीतील स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीच्या इतिहास प्रसिद्ध कार्यालयाच्या डोक्यावरील “काँग्रेस” हा शब्दच कार्यकर्त्यांनी पुसून काढल्याचे दृश्य टीव्हीवर पाहिले. पाठोपाठ मिरज काँग्रेस कमिटीच बरखास्त केल्याच्या ठराव ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला, असं विश्वास पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

"एकेकाळी काँग्रेसच्या त्या इमारतीच्या बांधकामासाठी सांगलीतल्या रस्त्या रस्त्यात आपल्या धोतराचा सोगा  करून वर्गणी गोळा करण्यासाठी वसंतदादा नावाचे शेतकरी लोकनेते पायपीट करत हिंडले  होते. महाराष्ट्रात रक्तघाम गाळून काँग्रेस वाढवणारे दोन बलाढ्य नेते म्हणजे एक यशवंतराव आणि दुसरे वसंतदादा. दादा  स्वातंत्र्य लढ्यातील एक महान सैनिक, ज्यांनी सांगलीच्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिल्या  होत्या. दादा आम्हाला नेहमीच सांगत, “ माझे शालेय शिक्षण फारसे झाले नसल्याने मी  मंत्री व्हायचे कधी माझ्या डोक्यात नव्हते.  

तेव्हा आमच्या मिरज तालुक्यात तीन बॅरिस्टर होते. पैकी काहीना मी राजकारणात आणले. पण त्यांची कार्यपद्धती बघून कार्यकर्तेच माझ्याकडे ओरड करू लागले  की, दादा तुम्हीच नांगर हातात घ्या, तरच नांगरट चांगली होईल. म्हणूनच मी नाईलाजाने राजकारणात आलो. मंत्री झालो.”दादा महाराष्ट्राचे अनेकदा #मुख्यमंत्री कोणा बुवाच्या किंवा बाबाच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या पाठिंब्याच्या रेट्यामुळेच झाले होते. 

पंतप्रधान राजीव गांधींवर बोफोर्सच्या तोफा खरेदीतील भ्रष्टाचाराचे मोठे वादळ  

1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सच्या तोफा खरेदीतील भ्रष्टाचाराचे मोठे वादळ  घोंगावत आले होते.. त्याचे स्वरूप इतके विराट होते की, कोणत्याही क्षणी राजीव  गांधींना राजीनामा द्यावा लागणार होता.काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात प्रचंड खदखद होती. त्यावेळी ग्यानी  झेलसिंग हे राष्ट्रपती होते. त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे बोपोर्सचे डॉक्युमेंट्स अवलोकनार्थ मागितले होते. जे भारत सरकारने त्यांना अजिबात दिले नाहीत. त्यावेळी राजीव गांधींचे सरकारच बरखास्त करायचे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी मनोमन ठरविले होते, हा इतिहास आहे.

त्याच काळात वसंतदादा हे राजस्थानचे राज्यपाल होते. मी नुकताच कॉलेजातून बाहेर पडल्यावर क्रांतिसिंह #नाना_पाटील आणि पत्री सरकार या विषयावर “क्रांतीसुर्य” नावाची कादंबरी लिहिली होती. ती वसंतदादांना खूप आवडली होती. त्यांनी मला कौतुकाने बोलावून घेतले.

त्या दिवसात दादा व मी संयुक्तपणे आझादीनंतरचा महाराष्ट्र या विषयावर पुस्तक लिहायचे ठरविले होते. त्यानिमित्ताने मी जयपुरला चार-पाच वेळा गेलो होतो. दादांचे तिथले राजभवन , त्या पाठीमागची ती 8-10 एकराची विस्तीर्ण हिरवळ,  त्यावर पिसारा फुलवत नाचणारे साठसत्तर  मोर मला अजून आठवतात.
बोफर्सच्या त्या वादळात राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून  हटविण्यासाठी ग्यानी झेलसिंग इतके पेटून उठले होते की, त्यांनी काँग्रेस अंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. राजीवजींच्या ठिकाणी व्यंकटरमण किंवा पी. व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान बनवायचे त्यांनी नक्की ठरवले होते. मात्र ऐनवेळी नरसिंहराव यांनी माघार घेतली. “एवढे मोठे बंड करायचे तर माझ्या ऐवजी ग्यानीजी आपण वसंतदादांचा विचार करा. ते स्वतंत्रता सेनानी आहेत. त्यांचा देशातला लोकसंग्रह माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे” असा सल्ला नरसिंहरावांनी ग्यानीजिना  दिला. तेव्हा  राष्ट्रपती ग्यानीजीनी वसंतदादांना  जयपूरहून तातडीने बोलावून घेतले. पक्षाला आणि राष्ट्राला आपल्या नेतृत्वाची गरज कशी आहे हे पटवून सांगितले.

 “राजीवजी आपका सिंगासन खतरे मे है” 

दादांच्या रक्तात आणि हाडामांसात काँग्रेस इतकी भिनलेली होती की, त्यांनी त्यापुढे इतिहासाने व कळीकाळाने देऊ केलेल्या सर्वोच्च  सिंहासनाचा स्वार्थ आपल्या अंगाला चिकटूही  दिला नाही. ते तडक राष्ट्रपती भवनातून राजीव गांधी यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी “राजीवजी आपका सिंगासन खतरे मे है” असे सांगितलेच. शिवाय काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभावित बंडामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती राजीव गांधींना दिली .

दादांच्या नकारानंतर पक्षातील संभावित बंड शमले. हळूहळू बोफर्सचे वादळही शांत होत गेले.. ग्यानी झेलसिंग यांचा कार्यकाल सुद्धा लवकरच संपला. राजीवजीनी त्याना  राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म दिली नाही. त्यांनी मागितलीही नाही.

यशवंतराव व वसंतदादांचे या महाराष्ट्रावर प्रचंड उपकार आहेत. पण त्यांच्या पक्षाचे लोक सुद्धा त्यांना लोणच्या पुरते वापरतात. एकच उदाहरण सांगायचे तर अंधेरी पश्चिमला मंत्रालयातील अनेक निम्नस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवासी संकुले व स्वतःचे फ्लॅट्स मिळाले आहेत. ते केवळ वसंतदादा यांच्यामुळेच.
वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्येही एक धमाल असे वेगळे नाते होते. जेव्हा मुंबईत मुरली देवरा मराठी माणसांची कळ काढायचे. तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेले दादा ऐनवेळी असे एखादे वाक्य बोलायचे की,  ज्यामुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार निवडून यायचे हा इतिहास आहे.

काल जेव्हा स्टेशन रोडवरच्या त्या ऐतिहासिक इमारतीवरील “काँग्रेस” हा शब्द डोळ्यात पाणी आणत पुसून काढण्याचे दुर्दैव सांगलीकरावंर ओढवले. तेव्हा स्वर्गामध्ये वसंतदादांच्या आत्म्याला काय वाटले असेल ? ते संपतनाना, ते विठ्ठल दाजी, ते विठ्ठल आण्णा , विजयराव धुळूबुळू,  देवाप्पांना आवटी, पैलवान मारुती माने, डॉ.  चोपडे , नवले जी, गौरीहर सिंहासने, विष्णूअण्णा, आज या साऱ्यांच्या जीवाला काय वाटत असेल ? वसंतदादांच्या ध्येयासाठी झटलेल्या डॉ.शालिनीताई पाटील ह्यांचे कर्तृत्व सुद्धा डोळ्याआड करता येणार नाही, ते मान्यच करावे लागेल!

मी कोणा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. पण आज दादांच्या आशीर्वादावर अनेक सहकार सम्राट झाले. शिक्षण सम्राट झाले.  कोट्याधीशांची मांदियाळी या भूमीत निर्माण झाली. पण जनता आणि सर्वच पक्षांचे नेते वसंतदादा आणि यशवंतराव यांना ज्या प्रकारे विसरत चालले आहेत.
हा महाराष्ट्र फक्त दगडांचा नव्हे तर दगडाच्या काळजाचा आहे हे सिद्ध करत सुटले  आहेत, ते पाहताना मन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही.

चालून आलेल्या पंतप्रधानपदावर “ निष्ठा” ह्या एका शब्दासाठी   ज्या वसंतदादांनी लाथ मारली होती. त्याच महापुरुषाच्या नातवाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पद्धतीने आज  नाकारले जात आहे. ज्या प्रकारे वसंतदादांची परंपराच मोडीत काढण्याचे काम सुरू आहे ते बघून मात्र मनाला खूप क्लेश  वाटतो.
कालाय तस्मय नमः या शिवाय दुसरे काय !

—-विश्वास पाटील

Web Title: sangli lok sabha election Vasantdada Patil, Rajiv Gandhi was remembered by writer Vishwas Patil in a Facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.