Sangli: जत पूर्व भागात पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:55 IST2025-09-25T15:54:59+5:302025-09-25T15:55:34+5:30
२००९ च्या आठवणी ताज्या, पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले

Sangli: जत पूर्व भागात पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त
उमदी : जत तालुक्यात पूर्व भागात मागील आठवडाभर संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. बोरनदी दुथडी वाहत असल्याने पूरसदृशच स्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बांध फुटले आहेत. उभ्या पिकात, फळबागेत पाणी थांबले आहे.
जतपूर्व भागात गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रातील मका, तूर, बाजरी या शेती पिकांचे तर डाळिंब द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उमदी भागात अनेक घरांची पडझड देखील झाली आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली. यामुळे शेतकरी सुखावला होता. शेतकऱ्यांनी जास्तीचा खर्च करून मका, तूर, भुईमूग, मूग, बाजरी पिकांची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल आणि मागील कर्ज फिटेल, या आशेवर शेतकरी पिकांची कापणी, सुखवणी करत असतानाच पाऊस आला.
उमदी येथील विठ्ठलवाडी, पवार वस्ती, शेवाळे वस्ती, येथे मका, बाजरी, भुईमूग पिकात पाणी साचले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हळळी येथील मेडीदार वस्ती, पाटील वस्ती, येथील पिकांमध्येही पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. बोर्गी, बालगाव येथे सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने बोर नदी दुथडी भरून वाहत आहे. मोरबागी, गिरगाव, माणिकनाळ, सुसलाद, सोनलगी येथे मुसळधार पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदा, मका पिकाचे नुकसान झाले आहे. डाळिंब द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले आहे.
२००९ च्या आठवणी ताज्या
दुष्काळी तालुका असलेल्या जत तालुक्यात २००९ साली अतिवृष्टी व धुवाधार पाऊस झाला होता. या पावसाने बोर नदीला पूर आला. सहा गावाला पाण्याने वेढा दिला. तत्कालीन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी या भागात बोटी आणून लोकांना वाचवले होते. मागील चार दिवसात जत पूर्व भागात होत असलेल्या पावसामुळे २००९ ची आठवणी ताज्या झाल्या आहेत.
शेतात, घरासमोर पाणी साचले
अहिल्यानगर-विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याने काम पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी पाईप न घातल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरासमोर पाणी साचले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.