मिरजेत १२८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइनला रेल्वेमंत्र्यांची मान्यता, कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:27 IST2025-06-05T12:26:53+5:302025-06-05T12:27:20+5:30

जंक्शनवरून रेल्वे वाहतूक सुलभ होणार : नवीन कॉर्ड लाइन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ लोहमार्गाला जोडणार

Railway Minister approves Miraj Cord Line costing Rs 128 crore in Miraj, will facilitate fast travel to Kolhapur | मिरजेत १२८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइनला रेल्वेमंत्र्यांची मान्यता, कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार 

मिरजेत १२८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइनला रेल्वेमंत्र्यांची मान्यता, कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार 

मिरज : मिरजरेल्वे स्थानकाजवळ १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइन या १.७३ किमी प्रकल्पास रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवासी व मालवाहतूक कार्यक्षमता वाढून मिरज जंक्शनवरून रेल्वे वाहतूक सुलभ होणार आहे.

सध्या सोलापूर व बंगळुरू येथून मिरजेत येऊन कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांच्या इंजिनची दिशा बदलण्यासाठी गाड्या सरासरी दोन तास मिरजेत अडकून पडतात. प्रस्तावित कॉर्ड लाइनमुळे हा विलंब दूर होणार आहे. मालवाहतूक, प्रवासी गाड्यांसाठी कॉर्ड लाइन स्थानक होणार असल्याने सोलापूर व बंगळुरू येथून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार आहे.

मिरज स्थानकात रेल्वेगाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी कॉर्ड लाइनच्या प्रस्तावास मध्य रेल्वेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून सोलापूर व बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता मिरज स्थानकात थांबावे लागणार नाही. कोल्हापुरातून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र मिरज स्थानकातच येतील. मिरज स्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून कॉर्डलाइनमुळे येथे प्रवासी गाड्यांची गर्दी कमी होणार आहे.

सोलापूर व बंगळुरूकडून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्या इंजिनाची दिशा बदलण्यासाठी मिरजेत थांबल्याने त्यासाठी वेळ जातो. त्यावर उपाय म्हणून मिरजेत कोल्हापूर रेल्वे चाळ गेटपासून स्वतंत्र बायपास लाइनला मंजुरी मिळाली आहे.

इंजिन बदलावे लागणार नसल्याने वेळेची बचत

नवीन कॉर्ड लाइन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ कोल्हापूर लोहमार्गाला जोडली जाईल. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांना मिरज स्थानकात जाण्याची गरज राहणार नाही. इंजिनही बदलावे लागणार नसल्याने वेळेची बचत होईल. मिरज स्थानकापासून एक किमी अंतरावर असलेल्या कॉर्डलाइन स्थानकात एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल. बायपास कॉर्ड लाइनचा प्रयोग दौंड स्थानकातही झाला आहे.

Web Title: Railway Minister approves Miraj Cord Line costing Rs 128 crore in Miraj, will facilitate fast travel to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.