Sangli- अर्भक चोरी प्रकरण: बाळाला दूध पावडरवर जगवलं, ५६ तासांत महिला, बाळ ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:23 IST2025-05-06T14:21:44+5:302025-05-06T14:23:55+5:30

..त्यातून तिने मूल पळवण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज 

Police succeed in finding the baby stolen from the government hospital in Miraj within 56 hours | Sangli- अर्भक चोरी प्रकरण: बाळाला दूध पावडरवर जगवलं, ५६ तासांत महिला, बाळ ताब्यात

Sangli- अर्भक चोरी प्रकरण: बाळाला दूध पावडरवर जगवलं, ५६ तासांत महिला, बाळ ताब्यात

मिरज : येथील शासकीय रुग्णालयातून चोरीला गेलेल्या नवजात बाळाला ५६ तासांत शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले. बाळ चोरणारी महिला व नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळज येथून ताब्यात घेण्यात आले. दोन दिवस दूध पावडर पाजल्यानंतरही बाळाची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. बाळ पुन्हा कुशीत विसावल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांनी पुन्हा घडविली. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवारी दुपारी तीन दिवसांचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.

एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती. कोळे (ता. सांगोला) येथील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल होती. अज्ञात महिलेने नवजात अर्भकाला पळवून नेल्याने मातेसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

पोलिसांनी विविध ठिकाणी तपास पथके पाठवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व सावळज गावातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सावळज येथील सारा साहेबा साठे (वय २४) या महिलेस बाळासह ताब्यात घेतले. अपहरणप्रकरणी महिलेविरुद्ध गांधी चौक पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. दोन दिवस गाजत असलेल्या या प्रकरणातील अपहृत बाळ सुखरूप सापडल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

गर्भपात झाल्यानंतर अस्वस्थ

सारा साठे हिचा दीड वर्षापूर्वी सावळज येथील साहेबा साठे या पेंटरसोबत प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर तिचा गर्भपात झाल्याने ती मुलासाठी अस्वस्थ होती. त्यातून तिने मूल पळवण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज आहे.

प्रसुती झाल्याचं गावात सांगितलं

सारा साठे हिने बाळ पळवून नेल्यानंतर गावात शेजाऱ्यांना तिची महिन्यापूर्वी दुसऱ्या गावी प्रसूती झाल्याचे खोटे सांगितले होते.

दूध पावडरवर जगवलं

नवजात बाळाला तिने दोन दिवस दूध पावडर पाजले होते. आईच्या दुधापासून तीनच दिवसांत वंचित झालेल्या बाळाची दूध पावडर पिऊनही प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.

Web Title: Police succeed in finding the baby stolen from the government hospital in Miraj within 56 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.