Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:15 IST2025-08-20T13:14:47+5:302025-08-20T13:15:06+5:30
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या
दिलीप कुंभार
नरवाड : मिरज तालुक्यातून होणाऱ्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील पान उत्पादक शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला असून भविष्यात पानमळे टिकणार का? हा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरज तालुक्यात सुमारे १९० हेक्टर क्षेत्रावर पानमळे असून यामध्ये प्रामुख्याने नरवाड, बेडग, मालगाव, आरग याठिकाणी सुमारे ८५ हेक्टर पानमळे आहेत.
मे महिन्यांपासून पावसाने तालुक्याला उसंत दिली नसल्याने याचा सर्वाधिक फटका पानमळा पिकास बसला आहे. कारण पानमळ्यातील खाऊच्या पानवेलीला पाणी अधिक चालत नाही. पानवेलींची मुळे नाजूक असल्याने पावसाचे प्रमाण जास्त होऊन मुळे कुजून जातात. परिणामी पानवेली सुकून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. असाच प्रकार चालू पावसाने झाला आहे.
सतत पडणाऱ्या पावसाने पानवेलींच्या मुळ्या कुजून याचे स्पष्ट परिणाम येणाऱ्या हिवाळ्यात जाणवू लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अगोदरच म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळ्या जमिनीलगत आल्या असताना सध्या पडत असलेल्या पावसामुळे पानवेलींचे आयुर्मान कमी होणार आहे. पानवेलींच्या मुळ्या सुकू लागताच पानवेलींचा खुडा मंदावून अखेर बंद पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
पानमळ्याला पावसाळ्यातील पाणी नियोजन अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असून पावसाळ्यात पानमळ्याच्या वाफ्यात पाणी अजिबात साठू न देता ते पानमळ्याच्या बाहेर काढून दिले पाहिजे. -संगीता पवार, सहाय्यक कृषी अधिकारी
चालू वर्षी पानमळा पिकास पाऊस जास्त झाल्याने पानवेलींची मुळे कुजून शेतकऱ्यांचे येणाऱ्या हिवाळ्यात पूर्णपणे नुकसान होणार असून याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पानमळा पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. -मधूकर जाधव, पान उत्पादक शेतकरी, नरवाड