आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..; जयंत पाटील यांनी घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:15 IST2025-02-18T18:15:06+5:302025-02-18T18:15:39+5:30
इस्लामपूर : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही. त्यासाठी ...

आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..; जयंत पाटील यांनी घेतली फिरकी
इस्लामपूर : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही. त्यासाठी दळणवळण, ऊर्जा, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत व्यवस्था बळकट असायला हव्यात. त्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संपन्न आणि समृद्ध देश बनवण्यासाठी आरआयटीसारख्या संस्थांनी योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
राजारामनगर येथे कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयाने उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी वसतीगृह आणि अत्याधुनिक व्यायाम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, अरुण लाड, रोहित पाटील, सुहास बाबर, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, भगतसिंह पाटील, प्रतिक पाटील, दिलीपराव पाटील, प्रा. शामराव पाटील, प्रा. आर. डी. सावंत, मनोज शिंदे, आदित्य पाटील, राजवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. पाच ट्रिलियन डॉलरची जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायची आहे. तसेच, तरुणांचा देश म्हणून भारताला जगात अग्रस्थानी ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. ज्ञानाच्या जोरावर भारत जगावर राज्य करू शकतो. याची प्रचिती येत आहे.
ते म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, कृषी, सहकार क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या परिसराचा विकास झाला. जगात सुखाने जगण्याच्या निर्देशांकावर चर्चा सुरू आहे. अशावेळी सर्व क्षेत्रांतील पायाभूत विकास भक्कम करण्यावर भर द्यायला हवा. शहरातील वाढते नागरीकरण रोखण्यासाठी गाव-खेड्यांचा विकास करणे गरजेचे आहे.
आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..
नितीन गडकरी यांच्या दौऱ्यावरून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा झडत होत्या. आजच्या कार्यक्रमानंतर गडकरी राष्ट्रवादीत जातील अशी बातमी कराल, असे म्हणत जयंत पाटील यांनी पत्रकारांची भाषणात फिरकी घेतली. त्यावर गडकरी भाषणात म्हणाले, “जयंतराव राजकारणाचा फार विचार करायचा नाही, राजकारणातून समाजाच्या प्रगतीचे, हिताचे काम करत राहा,” असा सल्ला त्यांनी दिला. त्यावर सभा मंडपात हशा पिकला.
स्वायत्तता मिळाल्याने प्रगती : जयंत पाटील
आरआयटी ही देशातील पहिल्या शंभरमधील एक महाविद्यालय आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतर प्रगती साधली आहे. संशोधन, उत्पादन निर्मितीवर भर देत प्रथितयश संस्था म्हणून नावलौकिक कमावला आहे. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. आर. डी. सावंत यांनी आभार मानले.
पेठ-सांगली रस्ता लवकरच पूर्ण..
गेल्या अनेक वर्षांपासून पेठ-सांगली रस्ता रखडला होता. त्याचा उल्लेख करत गडकरी यांनी त्यासाठी मलाही बोल खावे लागत होते. मात्र, आता येत्या दोन महिन्यांत हा रस्ता अत्यंत दर्जेदारपणाने पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.