सांगलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भित्तिपत्रक चिकटवल्याचा प्रकार, अज्ञाताविरुद्ध महापालिका प्रशासनाकडून फिर्याद दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:16 IST2025-12-26T16:16:02+5:302025-12-26T16:16:35+5:30
शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली

सांगलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भित्तिपत्रक चिकटवल्याचा प्रकार, अज्ञाताविरुद्ध महापालिका प्रशासनाकडून फिर्याद दाखल
सांगली : ‘शहर असुरक्षित का... महायुती उत्तर द्या’ यासह इतर मजकूर असलेले भित्तिपत्रक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या डीपीवर चिकटवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधीक्षक सचिन पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील डॉ. आंबेडकर रस्त्यावरील क्रांती क्लिनिकजवळील चौकात असलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर वेगवेगळा मजकूर असलेले भित्तिपत्रक चिकटवण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. अधीक्षक सचिन पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तेव्हा डीपीवर ‘सांगलीकर जागे व्हा’, ‘महापालिकेत भ्रष्टाचार का थांबला नाही’, ‘महापालिका गुन्हेगारीमुक्त, नशामुक्त, भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त, गद्दारीमुक्त करण्याची हीच ती वेळ’ असे सहा फलक चिकटवले होते. त्याचे चित्रीकरण करून ते काढण्यात आले.
पाटील यांनी याबाबत शहर पोलिसांत फिर्याद दिली. नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल, तसेच महापालिका निवडणुकीत तोतयेगिरी करण्याच्या उद्देशाने हे फलक चिकटवल्याबद्दल बीएनएस १७४, ३५३ (१), (ब), महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, लोकप्रतिनिधित्व कायदा यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.