Sangli Politics: इस्लामपुरात नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील भरून काढणार, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:05 IST2025-05-19T19:04:50+5:302025-05-19T19:05:16+5:30
अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटात शहरात खमके नेतृत्वच ...

Sangli Politics: इस्लामपुरात नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील भरून काढणार, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटात शहरात खमके नेतृत्वच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेही शहरात सक्षम नेतृत्वच नाही. नगरपालिका निवडणुकीपूर्वी जयंत पाटील शहरातील नेतृत्वाची पोकळी भरून काढतील, अशी अपेक्षा आहे. अंतर्गत मतभेद असल्याने शहरातील नेतृत्व निवडणे आव्हानात्मक आहे. त्यामुळेच राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील आलबेल असल्याचे दाखवत आहेत परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पडझड त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर मतदारसंघात उभी केलेली विरोधी ताकद आव्हानात्मक आहे. त्यामुळेच आगामी नगरपालिका निवडणुकीत इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांच्या अपरोक्ष खमके नेतृत्व उभे करण्यासाठी आतापासूनच बांधणी केली पाहिजे. परंतु त्यांच्याच समर्थकांत अंतर्गत वेगवेगळे गट असल्याने शहराच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी पालिका निवडणुकीची सूत्रे प्रतीक पाटील यांच्याकडे द्यावी, अशीही कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.
जयंत पाटील यांना इस्लामपूर शहरात संपर्क साधताना ॲड. चिमण डांगे, शहाजी पाटील आणि खंडेराव जाधव यांना घेऊनच जनतेशी संपर्क साधावा लागतो. शहराच्या नेतृत्वाबद्दल काहीच निर्णय होत नाहीत. त्यामुळेच आगामी इच्छुक उमेदवार शोधण्यासाठी जयंत पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. प्रभागनुसार बूथ सक्षम करण्यासाठी पुन्हा मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. नवीन इच्छुक उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. आगामी नगरपालिका निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी गटासाठी सोप्या नाहीत म्हणून जयंत पाटील यांनी प्रभाग समित्या सक्षम करण्यापासून राबावे लागणार आहे. अन्यथा ऐनवेळी होणाऱ्या विरोधी विकास आघाडीला शह देणे जयंत पाटील यांना आव्हान असणार आहे, अशीही चर्चा इस्लामपूर शहरात आहे.
दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्यानंतर शहराला सक्षम नेतृत्व मिळाले नाही. त्यानंतर जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नेतृत्व उदयास आले आहे. त्याप्रमाणेच सध्या शहरातील राजकीय वाटचाल सुरू आहे. आमच्याकडे सक्षम नेते आणि कार्यकर्त्यांची फळी आहे. या जोरावरच आगामी निवडणुका आम्ही जिंकणार आहे. -शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष