Sangli Municipal Election Results 2026: भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद
By अविनाश कोळी | Updated: January 16, 2026 14:07 IST2026-01-16T14:03:39+5:302026-01-16T14:07:05+5:30
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजीत कोळी, काँग्रेसच्या दिपाली पाटील, अश्विनी कदम विजयी

Sangli Municipal Election Results 2026: भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद
सांगली : संपूर्ण महापालिका क्षेत्रात सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद झाली. याठिकाणी भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील यांच्या स्नुषा मीनल अजिंक्य पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागातून माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या पत्नी काँग्रेसच्या उमेदवार दिपाली पाटील निवडून आल्या. या प्रभागात काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला.
सांगलीवाडी येथे चुरशीने ७३.६४ टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले होते. येथील निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. बिग फाईटचा प्रभाग म्हणून याकडे पाहिले जात होते. याठिकाणी माजी आमदार दिनकर पाटील यांच्या स्नुषा निवडणूक लढवित होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसने दिपाली पाटील यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी भाजपच्या तिन्ही उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजीत कोळी, काँग्रेसच्या दिपाली पाटील व अश्विनी कदम या विजयी झाल्या. निवडणुकीच्या काळातच याठिकाणी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी नाकारल्यानंतर येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक व जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या हरीदास पाटील यांनी भाजपला पाठींबा दिला होता. याठिकाणी भाजपला विजयाची आशा होती. मात्र, जयंत पाटील यांनी व्यक्तिगत या प्रभागात लक्ष घातले होते. त्यामुळे माजी आमदार दिनकर पाटील यांना पराभवाचा मोठा धक्का बसला