Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:29 IST2026-01-19T20:28:38+5:302026-01-19T20:29:28+5:30
एकनाथ शिंदे युतीबाबत सकारात्मक

Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील
सांगली : महापालिकेत सत्ता स्थापनेबाबत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. भाजपला काठावरचे बहुमत मिळाले. शिंदेसेनेचे दोन नगरसेवकांना सोबत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सांगलीत भाजपचाच महापौर होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महापालिका निवडणूक निकाल नंतर मंत्री पाटील प्रथमच सांगलीत आले होते. भाजपच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत विजयी नगरसेवकांची चर्चा केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मालेगाव वगळता इतर सर्व महापालिका महायुतीचा महापौर होईल, असे सांगितले होते. जवळपास तशीच तिथे राज्यात सध्या आहे. त्यातील बहुतांश महापौर हे भाजपचे असतील. सांगलीत मात्र अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आहे. भाजपला ३९ जागा मिळाल्या. बहुमतासाठी एक जागा आवश्यक आहे. शिंदेसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना सोबत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तेही सकारात्मक आहेत.
महापौर निवडीला अजून वेळ आहे. २२ किंवा २३ जानेवारीला महापौर पदाचे आरक्षण निघेल आणि ३० जानेवारीला महापौर निवडीचे नोटिफिकेशन निघणार आहे. त्यामुळे आम्ही घाई करत नाही. त्यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जाहीर झाल्या. त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. २१ आहे. सध्या जिल्हा परिषदेसाठी युतीच्या घटक पक्षांसोबत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणी सुरू आहेत.
शिंदेसेनेचे दोन नगरसेवक सोबत आल्यास युतीचे संख्याबळ ४१ होईल. महायुतीतील आणखी एक नैसर्गिक मित्र राष्ट्रवादी (अजित पवार) बाहेर राहतो. त्यांना बरोबर घेण्याबाबत विचार होऊ शकतो, पण आधी निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या १६ नगरसेवकांना निर्णय करावा लागेल. मग त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी. राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील. ते बरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे. कारण, काठावरचे बहुमत विकासासाठी सोयीचे नसते. त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेण्याबाबत प्रयत्न करू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.