Sangli: जतमध्ये मारहाणीतील जखमीचा मृत्यू, संशयित दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:14 IST2024-12-31T13:14:17+5:302024-12-31T13:14:46+5:30
जत : जत येथील बसस्थानक आवारात एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. ...

Sangli: जतमध्ये मारहाणीतील जखमीचा मृत्यू, संशयित दोघे ताब्यात
जत : जत येथील बसस्थानक आवारात एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तो सोमवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मयत झाला आहे. चंद्रकांत इराप्पा वाघमारे (वय ३९, रा. उमराणी, ता. जत) असे मयताचे नाव असून शनिवारी सात वाजण्यापूर्वी ही घटना घडली.
पोलिसांनी दुपारीच सांगोला तालुक्यातील घेरडी व जत तालुक्यातील अंतराळ येथून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत वाघमारे हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. वरील संशयित आरोपी व चंद्रकांत हे तिघे मित्र होते. शुक्रवारी दि. २६ रोजी रात्री १२ नंतर जत बसस्थानकात थांबले असताना तिघांमध्ये अज्ञात कारणातून वाद झाला. यामध्ये संशयित आरोपींनी चंद्रकांत यांना बेदम मारहाण केली. यात चंद्रकांत खाली असणाऱ्या फरशीवर पडले. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रात्रीच जत ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मिरजेला रवाना करण्यात आले होते. आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी तत्काळ मयताचा पंचनामा करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री जत पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत जत पोलिस ठाण्यात आई रेणुका इराप्पा वाघमारे (वय ६०, रा. उमराणी, ता. जत ) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.