कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसचे मिरज स्थानकात स्वागत, धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:07 IST2025-09-25T16:07:00+5:302025-09-25T16:07:40+5:30
३० नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता ही रेल्वे दररोज धावणार

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसचे मिरज स्थानकात स्वागत, धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय
मिरज : कोल्हापूर, मिरज, कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीनुसार, दसरा दिवाळी हंगामासाठी गाडी कोल्हापूर–कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस बुधवारी सुरू झाली. मिरज जंक्शन स्थानकात या गाडीचे रेल्वे प्रवासी संघटना व प्रवाशांनी स्वागत केले.
क्र. ०१४५१/५२ ही गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत, शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे. मिरजेतून सकाळी ७:५० वाजता सुटून सोलापूर येथे दुपारी २:३० वाजता आणि कलबुर्गी येथे दुपारी ४:१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी कलबुर्गी येथून संध्याकाळी ६:१० वाजता सुटेल, सोलापूर येथे रात्री ८:३० वाजता थांबेल आणि मिरजेत पहाटे ३ वाजता पोहोचेल. मिरज–कुर्डुवाडी दरम्यान या गाडीला सर्व स्थानकांत थांबे आहेत. ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी तसेच माढा, मोहळ, दुधनी, अक्कलकोट रोड व गाणगापूर रोड येथे थांबा देण्याची व या गाडीला ‘देवदर्शन एक्सप्रेस’ असे नाव देण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली.
मिरज स्थानकात गाडीचे चालक पी. डी. चव्हाण व इम्रान मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर भोरावत, सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी संस्थेचे संदीप शिंदे, राजेंद्र पाटील, ॲड. अल्लाबक्ष काझी, कुमार पाटील, सोपान भोरावत, बसवंत भोरावत, वाय. सी. कुलकर्णी, राजू पाटील, आनंद राजपूत, रोहित भोरावत, शिवराज राजपूत, निखिल यादव, संतोष भोरावत, प्रशांत कोरे, शिवा भोसले यांच्यासह स्थानक अधीक्षक जी. आर. तांदळे, डी. सॅम्युअल जॉन, मुख्य तिकीट परीक्षक पांडुरंग मराठे आदी उपस्थित होते.
धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय
या विशेष गाडीमुळे कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, सोलापूरचे श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर, गाणगापूरचे श्री दत्तात्रेय मंदिर व कलबुर्गीतील श्री शरणबसवेश्वर मंदिर या धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय झाल्याचे मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले.