कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:17 IST2025-10-13T15:14:10+5:302025-10-13T15:17:11+5:30
पोलिसांकडून तपास सुरू : संशयित आरोपींची संख्या वाढणार

कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार
मिरज : कोल्हापुरातील बनावट नोटा प्रकरणाला आता मुंबई कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींमार्फत मुंबईत मोठ्या प्रमाणावर या नोटा वितरित झाल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत सखोल तपास करण्यात येत असून, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मिरजेच्या गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने कोल्हापुरातील सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग उघडकीस आणला. या ठिकाणावरून पोलिसांनी झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर, एक चारचाकी वाहन तसेच ५०० व २०० रुपयांच्या एकूण एक कोटी ११ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
वाचा: तुरुंगात मिळाले पैसा छापण्याचे ज्ञान अन् पोलिसाच्या मदतीने थाटले दुकान, १ कोटीच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
या प्रकरणाचा सूत्रधार पोलिस हवालदार इब्रार इनामदार याच्यासह सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. इब्रार इनामदारने आपल्या मुंबईतील जुन्या ओळखीचा सिद्धेश म्हात्रे यास या बनावट नोटा व्यवसायात सामील करून घेतले. म्हात्रे हा मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करतो. त्याच्या माध्यमातूनच मुंबईत मोठ्या प्रमाणावर या बनावट नोटा खपवल्याचा पोलिसांना संशय आहे.
संशयित आरोपींची संख्या वाढणार
म्हात्रेने बनावट नोटा मुंबईत आणखी कोणाला दिल्या, याचाही तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या बनावट नोटा खपविण्याची जबाबदारी सुप्रीत देसाई याच्याकडे देण्यात आली होती. मात्र, निवडणुकीपूर्वीच या टोळीचा भांडाफोड झाल्याने गैरव्यवहार टळला. या घोटाळ्यातील सूत्रधार हवालदार इब्रार इनामदार यास कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.