Sangli: दारू पिण्यास पैसे न दिल्याने भंगार विक्रेत्याचा खून झाल्याचे स्पष्ट, संशयित आरोपीस दोन दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:21 IST2025-08-13T18:20:06+5:302025-08-13T18:21:34+5:30
काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले

Sangli: दारू पिण्यास पैसे न दिल्याने भंगार विक्रेत्याचा खून झाल्याचे स्पष्ट, संशयित आरोपीस दोन दिवसांची कोठडी
मिरज : मिरज रेल्वेस्थानकात सतीश बाबुराव मोहिते या भंगार विक्रेत्याचा खून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष दुर्गा निंबाळकर (तिवटणा, ता. सोनपेठ, जि. परभणी) यास अटक केली असून न्यायालयाने त्यास दोन दिवस कोठडी दिली.
मिरज रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म नं. २ वर आरोग्य निरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी रात्री सतीश मोहिते याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वेस्थानक परिसरात भंगार बाटल्या गोळा करत होता. सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते प्लॅटफॉर्मवर बसला असता सतीश याच्याप्रमाणेच भंगार व्यवसाय करणाऱ्या संतोष निंबाळकर याने दारू पिण्यासाठी सतीशकडे पैसे मागितले. सतीश याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष याने त्यास काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले. यामुळे डोक्याला मार लागून सतीश गंभीर जखमी झाला.
यावेळी पळून जाणाऱ्या संतोष यास योगेश चव्हाण यांनी तेथे अडवून ठेवले. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीश यास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच सतीश याचा मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्याने सतीश याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले.
मिरज रेल्वे पोलिसात संतोष निंबाळकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. मृत सतीश यांची पत्नी दीपाली सतीश मोहिते (रा. इचलकरंजी रोड, हातकणंगले) यांनी संतोष याच्या विरुद्ध पतीच्या खुनाची फिर्याद दिली आहे. मिरज रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत.