Sangli: इस्लामपुरात मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारातील भाजीपाला गेला वाहून, विक्रेत्यांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:34 IST2025-09-15T15:33:45+5:302025-09-15T15:34:02+5:30
पालिका प्रशासनाच्या बाजार हलविण्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

Sangli: इस्लामपुरात मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारातील भाजीपाला गेला वाहून, विक्रेत्यांची तारांबळ
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरणारा भाजीपाल्याचा आठवडा बाजार गटारीतील पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने त्यात वाहून गेला. या पाण्याच्या लोटातून टोमॅटो, दोडका, भेंडी, वांगी वाहून गेली.तर भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. पालिका प्रशासनाच्या बाजार हलविण्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
शहरातील मुख्य भाजी मार्केटच्या इमारतीचे काम सुरू झाल्याने गेल्या महिनाभरापासून गुरुवार आणि रविवारचा आठवडा बाजार जयहिंद चित्रमंदिर, अंबिका आणि संभूआप्पा-बुवाफन देवालय परिसरातील रस्त्यावर भरवण्यास सुरुवात झाली; मात्र रविवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आणि भाजीपाला व्यापाऱ्यांची मोठी दैना उडवली.
हा परिसर उताराच्या बाजूला असल्याने आझाद चौक, डांगे चौक, तहसील कचेरी चौक अशा सर्व बाजूंनी जाणारे पाणी जयहिंद चित्र मंदिरापासून खाली वाहत असते. आज आठवडा बाजाराची मांडणी करण्यात शेतकरी आणि व्यापारी फळ विक्रेते, धान्य विक्रेते, मेवा विक्रेते व्यस्त होते. त्याच वेळी या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यासह गटारी तुंबून त्यातील पाणीही रस्त्यावरून वाहू लागल्याने भाजीपाला व फळ भाज्या या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
या परिस्थितीनंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता. रागाच्या भरात या सर्वांनी पुन्हा आपला माल उचलून तहसील कार्यालय परिसरातील मूळच्या जागी ठाण मांडले. पालिका प्रशासनाकडेही या समस्येवर कोणतेच उत्तर नव्हते.