Sangli: मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली, देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:36 IST2025-09-25T15:36:13+5:302025-09-25T15:36:33+5:30
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

Sangli: मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली, देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास
मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत मंगोबा मंदिरासह चार घरांत चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील दागिन्यांसह घरातील तीन लाखांचा ऐवज चोरून नेला.
मंगोबा मंदिराचे पुजारी विशाल क्षीरसागर मंगळवारी पहाटे पूजा करण्यासाठी मंदिरात आले. यावेळी मंदिराच्या दरवाजाची कडी तुटलेली होती. त्यांना मंगोबा देवाच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे दिसले. चोरट्यांनी देवाच्या अंगावरील दोन तोळ्यांची सोन्याची चेन, सोन्याचे दोन बदाम, अर्धा तोळा सोन्याची पेटी असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. याच रात्री गावातील अन्य तीन घरे फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.
गावातील भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी चोरट्याने चोरून नेली. प्रदीप भोसले यांच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड चोरली. पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातून साडेतीन ग्रॅम सोने, एक तोळा चांदी व २० हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रात्रीत चोरीच्या चार घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.
चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासह पथक दाखल झाले. श्वानपथकासह गुन्हा शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
चोरांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही व इतर पुरावे शोधण्यासाठी पोलिसांचे काम सुरू आहे. एकाच रात्री मंदिर आणि तीन घरे चोरट्यांनी फोडल्याने मल्लेवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.