सांगलीतील चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:33 IST2025-12-27T18:32:32+5:302025-12-27T18:33:35+5:30
मिरजेत आनंदा देवमाने यांची पुन्हा घरवापसी

सांगलीतील चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश
सांगली : ‘महापालिकेत जिरवाजिरवीचे राजकारण करू नका. विकासकामांना प्राधान्य द्या,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते पुण्यात माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या चार माजी नगरसेवकांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. पुण्यात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
माजी नगरसेवक अभिजित भोसले, स्नेहल सावंत, वसीम नायकवडी, सचिन सावंत यांच्यासह रज्जाक नायकवडी यांचे पक्षप्रवेश झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक बीरेंद्र थोरात, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, ‘विकासकामांवरून लोकांचे लक्ष हटविणाऱ्या विषयांचे राजकारण आपल्याला अपेक्षित नाही. पुरोगामी विचारसरणीला अनुसरून लोकांच्या हिताची कामे केली पाहिजेत. सांगली, मिरजेतील कामांसाठी चांगला निधी देऊ. तुम्ही महापालिका चांगली चालवा. लोकांचे लक्ष हटवणाऱ्या पाकिस्तान किंवा अन्य विषयांचे राजकारण योग्य नाही. महापालिकेचे बजेट वाढले पाहिजे. लोकांच्या दैनंदिन जीवनमरणाचे महत्त्वाचे विषय मागे पडता कामा नयेत. लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांची कामे करणे महत्त्वाचे आहे.
मिरजेत आनंदा देवमाने यांची पुन्हा घरवापसी
मिरज : आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसुराज्य पक्षातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश करणारे मिरजेतील माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी पुन्हा घरवापसी करत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत जनसुराज्य पक्षात प्रवेश केला.
आनंदा देवमाने गतवेळी भाजपमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर महापौर निवडणुकीत भाजपशी फारकत घेतली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चार महिन्यांपूर्वी आनंदा देवमाने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. मात्र, त्यानंतर पुन्हा राजकीय घडामोड होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरज दौऱ्यात मिरजेतील माजी नगरसेवकांसोबत देवमाने यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.