Sangli: इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र, अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:33 IST2025-07-26T19:33:05+5:302025-07-26T19:33:30+5:30
घडामोडींवरून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत

Sangli: इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र, अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
अशोक पाटील
इस्लामपूर : माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे, विश्वास डांगे यांचा भाजप प्रवेश बुधवार दि. ३० रोजी मुंबई येथे होणार आहे. या प्रवेश कार्यक्रमातून इस्लामपूर मतदारसंघात भाजपने धक्कातंत्र सुरू केले असून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींवरून इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे पूर्वी भाजपमध्ये होते. ते घरवापसी करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, नगरसेवक विश्वास डांगे आणि त्याचे विश्वासू समर्थक ३० जुलैला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याला डांगे समर्थकांनी दुजोराही दिला आहे.
गेल्या महिनाभरापासून डांगे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू होती. अखेर प्रवेशाला मुहूर्त सापडला. परंतु, डांगे यांच्यानंतर आता जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर दिल्ली येथील सहकार पुरस्काराच्या निमित्ताने संरक्षणमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
जयंत पाटील यांच्या राजकारणाचा पाया संस्थात्मक बांधणीवर उभा आहे. त्याखालोखाल इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक, सहकारच्या माध्यमातून अण्णासाहेब डांगे यांनी संस्थात्मक जाळे विणले आहे. डांगे यांचे विचार पूर्वीपासूनच भाजपशी मिळतेजुळते आहेत. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (जि. अहमदनगर) येथील विकासात्मक चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला होता. ॲड. चिमण डांगे धनगर समाजाचे नेतृत्व करत आहेत. भाजपने इस्लामपूर मतदारसंघात आता त्यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून राजकीय धक्कातंत्र अवलंबिले आहे.
भाजप प्रवेशासंदर्भात आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर वेळोवेळी चर्चा झाली आहे. याबाबत आपण एकत्रित विचार करू, असा सबुरीचा सल्ला जयंत पाटील यांनी दिला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. बुधवारी ३० जुलै रोजी मुंबई येथे प्रवेश कार्यक्रम होणार आहे. - ॲड. चिमण डांगे, माजी नगराध्यक्ष, इस्लामपूर, नगर परिषद.