Sangli Politics: अजितराव घोरपडे हाती घड्याळ बांधणार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:35 IST2025-06-09T19:35:07+5:302025-06-09T19:35:56+5:30

आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करा

Former minister Ajitrao Ghorpade will contest the upcoming elections on the clock symbol of Ajit Pawar group | Sangli Politics: अजितराव घोरपडे हाती घड्याळ बांधणार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना 

Sangli Politics: अजितराव घोरपडे हाती घड्याळ बांधणार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना 

महेश देसाई

कवठेमहांकाळ : माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मिरज येथे शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुकले आहे. आगामी निवडणूक या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरच लढण्याचा निर्धार केला आहे, तर कार्यकर्त्यांना गावागावात अजित पवार यांचा गट वाढवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोरपडे हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शुक्रवारी मिरज येथे बाजार समितीच्या सभागृहात सायंकाळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळसह मिरज भागातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांचा सत्कार ही आयोजित करण्यात आला होता; परंतु ते काही कामानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार इंद्रिस नायकवडी, पद्माकर जगदाळे, कवठेमहांकाळच्या माजी नगराध्यक्षा साधना कांबळे उपस्थित होत्या.

घोरपडे यांनी या बैठकीत आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढण्याचा इशारा देत कार्यकर्त्यांना आपापल्या गावात शाखा काढण्याचे आदेशही दिले, तसेच त्यांनी काही पदाधिकारी यांच्या निवडी तसेच महिला आघाडीच्या ही निवडी लवकरच करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत या बैठकीमुळे कवठेमहांकाळ तालुक्यासह मिरज पूर्व भागात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीत राहण्याचे आवाहन केल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणी करण्याचे संकेत दिले.

अजितराव घोरपडे हे एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटातूनच आगामी निवडणुकीसाठी शड्डू मारणार हे मिरज येथील बैठकीतून जवळपास दिसून आले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत घोरपडे घड्याळ चिन्हवरच निवडणूक लढणार, हे मात्र निश्चित झाले आहे.

Web Title: Former minister Ajitrao Ghorpade will contest the upcoming elections on the clock symbol of Ajit Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.