Sangli: वसगडे रेल्वेमार्गांवर शेतकरी झोपले, रेल्वे वाहतूक विस्कळीत; चर्चा अयशस्वी, आंदोलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:00 IST2025-07-18T19:00:45+5:302025-07-18T19:00:56+5:30
लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस पुणे-दौंड-पंढरपूर मार्गे मिरजेत

Sangli: वसगडे रेल्वेमार्गांवर शेतकरी झोपले, रेल्वे वाहतूक विस्कळीत; चर्चा अयशस्वी, आंदोलन सुरूच
मिरज : वसगडे (ता. पलूस) येथे भरपाईच्या मागणीसाठी रेल्वे विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दिवसभर शेतकरी व रेल्वे अधिकाऱ्यांत चर्चा अयशस्वी झाल्याने मिरज पुणे रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे लांब पल्ल्याच्या काही एक्स्प्रेस दौड मार्गे वळविण्यात आल्या. तसेच अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी वसगडे (ता. पलूस) येथील शेतकऱ्यांची जमीन रेल्वेने ताब्यात घेतली आहे. मात्र, २०१९ पासून या जमिनीचा मोबदला व भू भाडे देण्यात आले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासाठी वारंवार बैठका झाल्या, रेल्वेकडून मोबदला देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वसगडे येथे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलक शेतकरी व रेल्वे अधिकाऱ्यांत यापूर्वी झालेल्या अनेक बैठकांत जमिनीचा मोबदला व भू भाडे देणे आमच्याकडे नसून रेल्वे बोर्डाकडे असल्याचा पवित्रा रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे. परंतु, २०१९ पासून याबाबत टाळाटाळ सुरू असल्याने आता ठोस निर्णय झाल्याशिवाय मोबदला व भू भाडे देण्याबाबत ठोस निर्णय व तसे लेखी पत्र रेल्वेने दिल्याशिवाय रेल्वे मार्गावरील आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलन शेतकऱ्यांनी घेतला आहे.
लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस पुणे - दौंड - पंढरपूर मार्गे मिरजेत
बुधवारपासून शेतकऱ्यांच्या रेल्वे मार्गावर आंदोलनामुळे काही रेल्वेगाड्या मिरज ते पुणे या अप लाइनवरून रवाना करण्यात आल्या. दादर ते तिरूनेलवेल्ली व जोधपूर ते बेंगलोर या दोन लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस पुणे - दौंड - पंढरपूर मार्गे मिरजेत आल्या. शेतकऱ्यांनी पुणे ते मिरज रेल्वे मार्गांवर ठिय्या मारून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पुण्याहून मिरजेत येणाऱ्या रेल्वेगाड्या मिरज ते पुणे अप रेल्वे मार्गावरून आणण्यात आल्या.