Sangli Accident: इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी ठार, चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:57 IST2025-07-07T12:53:40+5:302025-07-07T12:57:45+5:30

रस्ता बनला मृत्यूचा सापळा..!

Farmer killed in collision with private bus on Islampur Sangli road | Sangli Accident: इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी ठार, चालकावर गुन्हा दाखल

Sangli Accident: इस्लामपुरात खासगी बसच्या धडकेत शेतकरी ठार, चालकावर गुन्हा दाखल

इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यावरील आंबेडकर नाका परिसरात भरधाव वेगात आलेल्या खासगी बसची पाठीमागून धडक बसून ७२ वर्षीय वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली. हा अपघात रविवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. गेल्या पंधरा दिवसांत नव्याने झालेल्या सिमेंटच्या चौपदरी रस्त्यावरील अपघातातील हा दुसरा बळी ठरला.

शंकर पांडुरंग वळसे (वय ७२, रा. उरुण) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पुतण्या राहुल शिवाजी वळसे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खासगी बस चालक महावीर भूपाल कडाप्पा (वय ४७, रा. कडाप्पा मळा, यशवंत कॉलनीजवळ, कबनूर ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध अपघात करून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उरुण परिसरातील शेतकरी शंकर वळसे हे आपल्या सांगली रस्त्यावरील शेतात सायकलवरून निघाले होते. आंबेडकर नाका परिसरात ते मुख्य महामार्गावरून शेताकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खासगी बसची त्यांना धडक बसली. या धडकेत ते सिमेंटच्या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक किरण दीडवाघ अधिक तपास करीत आहेत.

रस्ता बनला मृत्यूचा सापळा..!

पेठ-सांगली हा नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग इस्लामपूर शहरातून जातो. या सिमेंटच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. मात्र, या रस्त्याच्या आजूबाजूला अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यांची ये-जा सुरू असते. ठिकठिकाणी दुभाजकामध्ये अंतर ठेवून शेतकरी-नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोकळी जागा ठेवली आहे.

रस्ता प्रशस्त झाल्याने वाहने सुद्धा सुसाट वेगात धावत असतात. या सुसाट वेगाने रविवारी दुसरा बळी घेतल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्ते विकास प्राधिकरणाने अपघात टाळण्यासाठी शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादित राहील, अशी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Farmer killed in collision with private bus on Islampur Sangli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.