Sangli Municipal Election 2026: माघार घ्या, भविष्यात चांगली संधी देऊ; बंडखोरांना नेत्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:02 IST2026-01-02T14:01:22+5:302026-01-02T14:02:12+5:30
समजूत काढण्याचा प्रयत्न काहीअंशी यशस्वी, काहींची नाराजी कायम

Sangli Municipal Election 2026: माघार घ्या, भविष्यात चांगली संधी देऊ; बंडखोरांना नेत्यांचे आश्वासन
सांगली : महापालिका निवडणुकीत भाजपसह अन्य पक्षांना बंडाचे ग्रहण लागले आहे. उमेदवारी वाटपानंतर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काही बंडखोरांनी थेट अन्य पक्षांची वाट धरल्याने भाजपला धक्का बसला होता. आता भाजपच्या नेत्यांनी नाराजी दूर करण्याची मोहीम उघडली असून नाराज व बंडखोरांच्या घरापर्यंत जाऊन समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिवसभरात ६३ नाराजांची भेट घेत भविष्यात संधी देण्याची ग्वाहीही नेत्यांनी दिली.
यंदा भाजपकडे तब्बल ५२९ जणांनी मुलाखतीही दिल्या. नेत्यांनी अनेकांना तयारीला लागा, असा संदेश दिल्याने इच्छुकांनी प्रभागात गाठीभेटी घेत वातावरण तापवले होते; पण प्रत्यक्षात उमेदवार यादी जाहीर होताच अनेकांच्या पदरी निराशा आली. उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. काही नाराजांनी अपक्ष म्हणून अर्जही दाखल केले, तर काहींनी शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची वाट धरत उमेदवारी दाखल केली.
काहींनी निवडणुकीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप नेत्यांनी मनधरणी सुरू केली. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
गुरुवारी सायंकाळपर्यंत ६३ नाराज व अपक्ष इच्छुकांची भेट घेण्यात आली. उमेदवार वाटपातील गैरसमज, तक्रारी, अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भविष्यात न्याय देण्याचे आश्वासनही दिले गेले. संवादानंतर काही नाराज कार्यकर्त्यांनी अर्ज माघार घेण्याचा शब्द दिल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. भाजपमधील नाराजी काहीशी निवळत असल्याचे संकेत असले तरी खरे चित्र अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीची मुदत शुक्रवार, २ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून तोपर्यंत भाजप नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.
हेच का निष्ठेचे फळ?
भाजप नेत्यांनी नाराज व बंडखोर इच्छुकांच्या घरी भेट दिली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेकांनी हेच का निष्ठेचे फळ, असा सवाल केला. पक्षात दहा-पंधरा वर्षांपासून काम करत असतानाही ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आक्षेपही काहींनी घेतला. यावर नेत्यांनी सबुरीचा सल्ला देत काहींना स्वीकृतपदाचे, तर काहींना शिक्षण मंडळ सदस्याचे आश्वासन देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.