सांगली लोकसभेची १४ टेबलावर मतमोजणी, दुपारपर्यंत होणार निकालाचे चित्र स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:16 PM2024-05-22T16:16:47+5:302024-05-22T16:17:42+5:30

मतमोजणीच्या २० ते २५ फेऱ्या होणार, हाती उरले अवघे १४ दिवस..

Counting of votes of Sangli Lok Sabha will be held at 14 tables, the result will be clear by noon | सांगली लोकसभेची १४ टेबलावर मतमोजणी, दुपारपर्यंत होणार निकालाचे चित्र स्पष्ट

सांगली लोकसभेची १४ टेबलावर मतमोजणी, दुपारपर्यंत होणार निकालाचे चित्र स्पष्ट

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जूनला वेअर हौसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे १४ टेबलांवर होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या २० ते २५ फेऱ्या होणार आहेत. पलूस-कडेगाव, जत विधानसभेच्या २० तर सर्वाधिक खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी उमेदवारांचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी नीता शिंदे, डॉ. विकास खरात, राजीव शिंदे, सविता लष्करे, डॉ. स्नेहल कनीचे आदी उपस्थित होते.

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. या दिवशी १८ लाख ६८ हजार १७४ मतदारांपैकी ११ लाख ६३ हजार ३५३ मतदारांनी ‘इव्हीएम’वर आपले मत नोंदवले आहे. एकूण ६२.२७ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, याचे चित्र दि. ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

डॉ. राजा दयानिधी म्हणाले, वेअर हाैसिंग कॉर्पोरेशन मिरज येथील स्ट्रॉगरूममध्ये ईव्हिएम कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या आहेत. दि. ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ७ वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्राँगरूम उघडण्यात येणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.

यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील ३०९ मतदान केंद्रावरील मतमोजणी २२ फेरीत, सांगली विधानसभा मतदारसंघातील ३०८ मतदान केंद्रावरील मतमोजणी २२ फेरीत, पलूस-कडेगाव मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावरील मतमोजणी २० फेरीत, खानापूर विधानसभा मतदारसंघातील ३४८ मतदान केंद्रावरील मतमोजणी २५ फेरीत, तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील २९९ मतदान केंद्रावरील मतमोजणी २१ फेरीत आणि जत विधानसभा मतदारसंघातील २८१ मतदान केंद्रावरील मतमोजणी २० फेरीत होणार आहे.

अशी असेल संरचना

लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. याअनुषंगाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी ही प्रत्येकी १४ टेबलांवरून होणार आहे. त्यानुसार एकूण ८४ टेबल असतील. तसेच टपाली व इतर मतांच्या मोजणीसाठी एकूण २० टेबलांवरून होणार आहे.

‘त्या’ मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल..

यावेळी निवडणूक आयोगाने ८५ वर्षे वयावरील व दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रत्येकवेळी जशी टपाली मतांची मोजणी स्वतंत्र टेबलवरून होते, तशीच या मतांचीही मोजणी स्वतंत्र २० टेबलवरून होणार आहे.

हाती उरले अवघे १४ दिवस..

आजपासून १४ व्या दिवशी सांगली लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण?, याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे. सर्व विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मनुष्यबळाबाबतचा फॉरमॅट पाठविला असून, त्यांना कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Counting of votes of Sangli Lok Sabha will be held at 14 tables, the result will be clear by noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.