मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा; पृथ्वीराज पवार यांचा आरोप
By अशोक डोंबाळे | Updated: April 24, 2025 12:50 IST2025-04-24T12:49:54+5:302025-04-24T12:50:32+5:30
आयटी पार्क वरून काँग्रेस नेत्यांवर टीका

मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा; पृथ्वीराज पवार यांचा आरोप
सांगली : काँग्रेसचे नेते आयटी हबसाठी जिल्हा प्रशासनाकडे जागा मागत आहेत. प्रत्यक्षात या हबसाठी अत्यंत योग्य असलेल्या मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर त्यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेत्यांचा डोळा आहे. तो मोह ते सोडणार आहेत का? मोक्याच्या जागांवर आपण डोळा ठेवायचा आणि विकासासाठी वेगळी जागा मागायची, हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.
पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगलीला आयटी, सिलिकॉन, स्कील युनिव्हर सिटी तत्सम नॅान पोल्युटीग इंडस्ट्री व्हावी, यासाठी आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सांगलीतील तज्ज्ञांशी संवाद साधून त्याची दिशा ठरवली. सरकारकडे पाठपुरावा केला. सर्वांनी ताकद लावली तर त्यात आगामी काळात यश येईल. त्या अर्थाने आम्ही काँग्रेस नेत्यांच्या त्या मागणीचे स्वागतच करतो, मात्र त्यांच्या कृतीत आणि बोलण्यात फरक आहे. ते थेट मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेची मागणी का करत नाहीत ? महाविकास आघाडी सरकारचा काळात शासकीय डेअरी चा ५० एकराहून अधिक क्षेत्र हे सांगलीत रोजगार निर्मितीसाठी वापरले पाहिजे.
शासकीय दूध डेअरीच्या जागेचा बाजार होता कामा नये, यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर जागेचा बाजार थांबला. अन्यथा, आज त्याचे तुकडे करून अनेकांनी ते वाटून खाल्ले असते. त्यात काँग्रेसच्या एका नेत्याच्या संस्थेस १० एकर तर दुसऱ्या एका नेत्याचा काॅलेजला १० एकर आणी उर्वरित ३० एकर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या डेअरीला असा बाजार ठरला होता. कवलापूर विमानतळाचा जागे सोबतच ह्या अत्यंत मोक्याच्या जागेवर ही दरोडा घालायचा प्लॅन होता हे काही लपून राहिलेले नाही.
प्रदूषण विरहित उद्योग करणार
सांगलीच्या विकासाला गती देण्यासाठी औद्योगिक क्षेत्र विकास, कवलापूर विमानतळ, आयटी , इलेक्ट्रॉनिक्स, कौशल्य विद्यापीठ तत्सम प्रदूषण विरहित उद्योग, आदी विषय आमच्या अजेंड्यावर आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याबाबत सकारात्मक आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत त्याला साथ देत आहेत. त्यासाठी मिरज शासकीय दूध डेअरीची जागा महत्त्वाची आहे, असेही पृथ्वीराज पवार म्हणाले.