‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:46 IST2025-07-24T18:42:40+5:302025-07-24T18:46:06+5:30
'नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत'

‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे नुकतीच केली आहे. यावर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने आ. जयंत पाटील यांनी त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल शासनावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे ‘जयंत पाटील म्हणजे सरकार नव्हे’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केल्याने दोघा नेत्यांत संघर्ष पेटला आहे.
उरूण-इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर यावर आ. जयंत पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत. लोकल बॉडी अस्तित्वात नाही. उरूण-इस्लामपूरचा लोकप्रतिनिधी मी आहे, अनेक वर्षे मी येथून निवडून येत आहे. सरकारने माझा विचार घेतला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतरावांच्या टीकेवर उत्तर दिले. येथील जनतेची मागणी असल्याने ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आले आहे. तुम्ही सरकार नाही, नामकरणाविषयी सरकारला विचारले पाहिजे, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.
नामांतराचा नवा वाद काय आहे?
इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर शहराच्या नावापुढे असणाऱ्या उरूण या नावाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उरूण परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून उरूण-ईश्वरपूर असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे. उरूण परिसराला इतिहास आहे. पुरातन कागदपत्रांमध्ये उरूण शहराचा उल्लेख आढळतो. दोन्ही शहरे एकत्रित वसलेली असल्यामुळे जोड शहर म्हणून उरूण-इस्लामपूर अशीच ओळख शहराची आहे.
कधी मैत्री, कधी राजकीय संघर्ष
जयंत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने संवाद व भेट होत असल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. जयंत पाटील यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे फडणवीस यांनीही यावर स्पष्टीकरण देत पक्षाव्यतिरिक्त वेगळा संवाद असू शकतो, असे सांगितले होते. दोन्ही नेत्यांकडून मैत्रीव पक्षांपलिकडच्या नात्याचा उल्लेख केला गेला. मात्र वादाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांत वाक् युद्ध रंगले आहे.