Sangli: जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पुन्हा पुनर्बांधणी; डांगे, शिंदे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:52 IST2025-07-18T18:51:57+5:302025-07-18T18:52:23+5:30
अद्याप डांगे यांनी निर्णय घेतलेला नसल्याचे चिमण डांगे यांनी स्पष्ट केले

Sangli: जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची पुन्हा पुनर्बांधणी; डांगे, शिंदे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. पहिल्या टप्प्यात तत्कालीन भाजपचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांना पुन्हा भाजपमध्ये येण्याचा डाव आखला आहे. तर आष्टा शहरातील दिवंगत विलासराव शिंदे गटाचे नेतृत्व करणारे वैभव शिंदे यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपमधून हालचाली गतिमान केल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी अगोदर आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला भाजपमय करण्याची खेळी केली जात आहे.
गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि दिवगंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांना टिपले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर वैभव शिंदे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी झाले. सध्या आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे कार्यरत आहेत. आता नव्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वैभव शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
इस्लामपूर मतदारसंघावर राजारामबापू पाटील उद्योग समूहाच्या ताकदीवर आमदार जयंत पाटील यांच्याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समूह आज अबाधित असला तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी कार्यकर्त्यांत आजही संभ्रम निर्माण झाला आहे. याचाच फायदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उठवण्याच्या तयारीला लागले आहेत. आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी धनगर समाजातील युवा नेतृत्व तत्कालीन नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे यांची ताकद आजही आहे.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर, आष्टा शहरात उभे केलेले शैक्षणिक संकुल आणि सहकार क्षेत्रातील संस्था दिमाख्याने उभ्या आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वाश्रमीचे भाजपमध्ये असलेले अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे, विश्वास डांगे यांच्याशी चर्चा करून भाजपची ऑफर दिली आहे. याबाबत अद्याप डांगे यांनी निर्णय घेतलेला नसल्याचे चिमण डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
आमचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करावी, अन्यथा पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. भाजप प्रवेशासंदर्भात माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. परंतु मध्यंतरी पुणे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी जवळीक साधून दिवंगत विलासराव शिंदे यांच्या गटाविषयी प्राथमिक माहिती घेतली. आगामी काळात आपण भेटू, असा सबुरीचा सल्ला दिला आहे. तरी आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका लवकर स्पष्ट करावी, जेणेकरून कार्यकर्ते कोलांट्या उड्या मारण्याचे थांबतील. - वैभव शिंदे, संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक