Sangli Municipal Election 2026: नाराज इच्छुकांची मनधरणी करताना उमेदवारांची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:31 IST2026-01-07T18:30:37+5:302026-01-07T18:31:36+5:30
अधिकृत उमेदवारांना फटका बसू नये म्हणून काळजी

Sangli Municipal Election 2026: नाराज इच्छुकांची मनधरणी करताना उमेदवारांची दमछाक
सांगली : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षांतर्गत मतभेद कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे काही इच्छुक नाराज आहेत, त्यामुळे त्यांना प्रचारात सक्रिय करताना उमेदवारांची दमछाक होत आहे.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षात उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांची बैठक घेऊन पक्ष निरीक्षक समजूत काढत आहेत. पण, उमेदवारीसाठी इच्छुकांची नाराजी दूर होत नसल्याचे दिसत आहे. खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या नाराजांना काँग्रेसमध्ये खेचून शहरात पक्ष मजबूत करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
प्रभाग ११ मधील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्या आहेत. याच प्रभागातील काँग्रेसमधील काही इच्छुकांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळविली आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही नाराजांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. याप्रमाणेच सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील अन्य प्रभागामध्येही भाजप, काँग्रेस पक्षातील नाराज इच्छुक प्रचारात सक्रिय नाहीत. या इच्छुकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय करताना उमेदवारांची दमछाक होत आहे.
विश्वजित कदम यांच्याकडून थेट संवाद
काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी नाराज कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महापालिकेच्या निवडणुकीत जागा मर्यादित असून, इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक प्रभागांत एकाच जागेसाठी चार ते पाचजण इच्छुक होते. त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र, याचा अर्थ संबंधित कार्यकर्त्यांचे योगदान कमी लेखले जात नाही, असे सांगत भविष्यात पक्षाकडून अधिक मोठी जबाबदारी देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच पक्षशिस्त आणि संघटनात्मक ताकद यावर भर देत नाराज पदाधिकाऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही कदम यांनी केले.
नेत्यांकडून समजूत
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्याने काही काळ नाराज असलेले इच्छुक आता नेत्यांच्या समजुतीनंतर पुन्हा प्रचारात सक्रिय होतील का, की निवडणुकीपासून दूर राहतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत संघर्ष कमी होऊन प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. ज्यांची नाराजी दूर झाली नाही, असे कार्यकर्ते आपल्या विरोधात प्रचार करणार का? अशी भीती उमेदवारांना आहे.