Sangli: फडणवीस यांची 'साखर' चाल, उद्योगात नवी समीकरणं; भडंकबेत ४८ एकर जागेत कारखान्याची स्थापना होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:50 IST2025-09-15T15:49:53+5:302025-09-15T15:50:18+5:30
फडणवीस यांचे निष्ठावंत भाजपचे विक्रम पाटील यांनी विरोधी पॅनलचा पराभव करत साखर उद्योगात प्रवेश केला

Sangli: फडणवीस यांची 'साखर' चाल, उद्योगात नवी समीकरणं; भडंकबेत ४८ एकर जागेत कारखान्याची स्थापना होणार
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांचे सहकारी साखर उद्योगात वर्चस्व आहे. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर पाटील यांची राजकारणात भक्कम पकड आहे. त्यांना शह देण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगाच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. आता भडकंबे (ता. वाळवा) येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत भाजपचे विक्रम पाटील यांनी विरोधी पॅनलचा पराभव करत साखर उद्योगात प्रवेश केला आहे.
तत्कालीन दिवंगत डॉ. एन. डी. पाटील यांच्या समर्थकांनी भडकंबे (ता. वाळवा) येथे २००० मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी ४८ एकर जमीन आरक्षित करण्यात आली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून नियोजित कारखान्याची उभारणी थंडावलेली होती.
यामुळे यावर्षी या कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाली. यामध्ये शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शेतकरी विकास पॅनलने आपले उमेदवार निवडून दिले. त्यांच्याविरुद्ध भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी शेतकरी विकास पॅनल उभे करून विरोधी पॅनलचा पराभव केला. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात साखर उद्योगात विक्रम पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.
वाळवा तालुक्यात पहिला साखर कारखाना राजारामबापू पाटील यांनी उभारला. त्यानंतर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यावेळी काहींनी विरोध केला; तरीही हा कारखाना उभारला गेला. आमदार जयंत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात एकूण तीन साखर कारखाने कार्यरत केले आणि ऊस उत्पादकांची ताकद वाढवली. आता त्यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित साखर कारखान्याची उभारणी दोन वर्षांत करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळेल आणि हजारो तरुणांना रोजगार मिळेल. - विक्रम पाटील, पॅनल प्रमुख, शेतकरी विकास पॅनल.