छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:08 IST2026-01-09T16:07:20+5:302026-01-09T16:08:05+5:30
सांगलीत प्रचारसभा, युतीसाठी आम्ही मोठे प्रयत्न केले

संग्रहित छाया
सांगली : छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते सांगलीत गुरुवारी वंचित बहुजन आघाडी व संलग्न पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते.
वंचितचे स्वागत जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले. ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘आम्ही मोठ्या पक्षांसोबत युतीसाठी प्रयत्न केले. पण कोठून तरी फोन आले की त्या पक्षांचे लोक उठून जायचे. वंचितबरोबर कोणाचीही युती होऊ नये यासाठी दबावतंत्र वापरण्यात आले. आमच्या विजयाची धास्ती या पक्षांनी घेतली. अजित पवार यांच्यासोबत बोलणी सुरू झाली आणि अचानक ‘नाही’ असा निरोप आला.
महायुतीतील सगळेच घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. सत्ताधारी भाजप मित्रपक्षांवर दबाव टाकत आहे. या पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व शिल्लक ठेवलेले नाही. त्याद्वारे विरोधकच संपविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच भाजपसोबत कुठेही युती करायची नाही हे सुरुवातीलाच ठरवले होते’.
ॲड. आंबेडकर म्हणाले, सरकार संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत आहे. ते वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. महापालिका निवडणुकीतून आपली ताकद दाखवा. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता आणा.
महादेव जानकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या छोट्या पक्षांची वाईट अवस्था केली. आमचे मतदान ९० टक्के असतानाही सत्ता मात्र दुसऱ्याचीच असते. शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्हाला सत्तेत घेताना मात्र लाज वाटते.
यावेळी बंडू डोंबाळे, ओबीसी आघाडीचे अजित भांबुरे, रासपचे अजित पाटील, शिवाजी शेंडगे, कालिदास गाढवे, सतीश गारंडे, रवींद्र सोलनकर, दिलीप कांबळे, पवन चंदनशिवे, संध्या आवळे, आकाराम कोळेकर, पुष्पा आलदर, कृष्णा मासाळ, संग्राम मोरे, शिवाजी त्रिमूखे, चंद्रकांत मालवणकर, संगीता कांबळे, शिवाजी वाघमारे, प्रिया चंदनशिवे, प्रतीक कुकडे आदी उपस्थित होते.