सांगली जिल्ह्यात भाजपला धक्का; तीन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा, आमदार पडळकरांचे विश्वासू समर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:23 IST2025-06-19T18:20:54+5:302025-06-19T18:23:38+5:30

हे प्रमुख तीन पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू समर्थक

BJP suffers setback in Sangli three office bearers from Khanapur constituency resign abruptly | सांगली जिल्ह्यात भाजपला धक्का; तीन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा, आमदार पडळकरांचे विश्वासू समर्थक

सांगली जिल्ह्यात भाजपला धक्का; तीन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा, आमदार पडळकरांचे विश्वासू समर्थक

विटा : खानापूर मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कलह निर्माण झाला असून पक्षाचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे व विटा शहराध्यक्ष सौ. अर्चना पंकज दबडे या तीन प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

या राजीनामा सत्राचे नेमके कारण गुलदस्त्यात असले तरी याला पक्षांतर्गत कुरघोड्या व गटबाजीची किनार असल्याची चर्चा सुरू आहे. हे प्रमुख तीन पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू समर्थक असल्याने आमदार पडळकर गटाला धक्का बसला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांचे विटा येथील खंदे समर्थक पंकज दबडे हे भाजपचे जिल्हा सचिव तर त्यांच्या पत्नी सौ. अर्चना दबडे या भाजपच्या विटा शहराध्यक्षा म्हणून पदावर कार्यरत होत्या. तसेच खानापूरचे संदीप ठोंबरे हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करीत होते. हे तीनही प्रमुख पदाधिकारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय समर्थक मानले जात होते. या तिघांनी एकाच वेळी पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनामा अस्त्रामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

पुढील राजकीय भूमिका काय..

या राजीनामा सत्रानंतर पंकज दबडे यांनी येत्या दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून पंकज दबडे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

Web Title: BJP suffers setback in Sangli three office bearers from Khanapur constituency resign abruptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.