Sangli: कवठेमहांकाळमध्ये शिजतंय पक्षफुटीचे राजकारण, भाजपाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्के देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:16 IST2025-09-27T19:15:39+5:302025-09-27T19:16:14+5:30
समीकरणे बदलणार

Sangli: कवठेमहांकाळमध्ये शिजतंय पक्षफुटीचे राजकारण, भाजपाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्के देण्याची तयारी
महेश देसाई
कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पाडण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. एक मातब्बर महिला नेत्या त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाच्या वाटेवर असल्याने तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने कवठेमहांकाळ तालुक्यात पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी गळ टाकला आहे. गाव पातळीवरील प्रमुख नेते व कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलासाठी हालचाली करत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का देण्याची त्यांची तयारी सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकारणात मातब्बर असलेल्या या नेतृत्वाच्या घरातून अनेक वर्ष कवठेमहांकाळ तालुक्याचे राजकारण सांभाळले गेले.
मात्र, गेल्या काही वर्षांत खच्चीकरण झाल्याची भावना या गटातील कार्यकर्त्यांतून सुरू आहे. बंद अवस्थेत असलेल्या सहकारी संस्था सुरू करण्यासाठी पक्षातून कोणतीही मदत मिळत नसून उलट विरोधच केला जात असल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे नाराज होऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक मोठा गट भाजपा प्रवेशाच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने पहिल्या फळीतील नेत्यांकडे तसेच कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहेत. नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिलेली दुय्यम वागणूक हे या फुटीमागचे प्रमुख कारण मानले जात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर युवा नेत्याने कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवल्याने नाराजीची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वेगळा पर्याय निवडण्यास सुरुवात केली असल्याचीही चर्चा कार्यकर्त्यांच्यात रंगली आहे.
महिला नेत्याच्या भाजपा प्रवेशाने व गाव पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या पक्ष बदलाने येत्या काळात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांचा एकच विधानसभा मतदारसंघ आहे. तरीही विद्यमान लोकप्रतिनिधींचे कवठेमहांकाळ तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.