उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:37 IST2025-08-11T16:37:26+5:302025-08-11T16:37:52+5:30
धारदार कुकरी जप्त, पसार संशयितांचा शोध

उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार
सांगली : उल्हासनगर (जि. ठाणे) येथे दुकानाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या माधवनगर (ता. मिरज) येथील राकेश प्रकाश तिरमारे (वय ४०, रा. गुरुवार पेठ, माधवनगर) याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली. तिरमारे यांच्याकडून धारदार कुकरी जप्त करण्यात आली आहे. यावेळी तिरमारे याचे चार साथीदार फरार झाले.
उल्हासनगर येथील कापड व्यापारी सागर केसवानी आणि माधवनगर येथील बाफना यांच्यात व्यवहारातील आर्थिक देवघेवीतून वाद सुरू आहे. सागर केसवानी यांनी जीन्स कापडाची ऑर्डर देऊन माल घेऊन गेल्यानंतर १९ लाख ६४ हजार रुपये परत केले नसल्यामुळे ममता राजेंद्रकुमार बाफना (वय ५२, रा. मंगळवार पेठ, माधवनगर) यांनी केसवानीविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात १५ दिवसांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सागर केसवानी यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
एकीकडे हा वाद सुरू असतानाच केसवानी यांच्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी संशयित राकेश तिरमारे आणि त्याचे साथीदार उल्हासनगर येथे ८ ऑगस्ट रोजी गेले होते. संशयितांनी केसवानी यांच्या दुकानाचा फलक काढून तेथे बाफना यांच्या फर्मचा फलक लावला. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. स्वत:चे कॅमेरे लावले. दि. ९ रोजी रक्षाबंधनाची सुटी होती. परंतु माल पाठवायचा असल्यामुळे केसवानी यांच्या पत्नी केसर सागर केसवानी (वय ३०) या दि. ९ रोजी दुकानात गेल्यानंतर त्यांना संशयितांनी दुकानाचा ताबा घेतल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यास हा प्रकार कळवला. त्यानंतर पोलिसांना घेऊन दुकान गाठले. यावेळी पोलिसांनी राकेश तिरमारे याला कुकरीसह ताब्यात घेतले तर त्याचे साथीदार पळून गेले. याप्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यात तिरमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पसार संशयितांचा शोध
हर्षल बाफना आणि साथीदारांनी दुकान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला म्हणून केसर केसवानी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश तिरमारे याला अटक केली आहे. तर इतर साथीदारांचा हिललाईन पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.