स्वस्तात मस्त प्रवास; अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर दर्शन यात्रा आता एका मुक्कामात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:46 IST2025-10-06T16:45:42+5:302025-10-06T16:46:21+5:30
सकाळच्या कोल्हापूर - कलबुर्गी रेल्वेमुळे सोय

स्वस्तात मस्त प्रवास; अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर दर्शन यात्रा आता एका मुक्कामात
सांगली : कोल्हापूर ते कलबुर्गी मार्गावर सकाळच्या सत्रात रेल्वे सुरू झाल्याने अक्कलकोटसह विविध धर्मस्थळांची दर्शन यात्रा एकाच मुक्कामात करणे शक्य झाले आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.
कोल्हापूर ते कलबुर्गी मार्गावर नुकतीच सकाळच्या सत्रात धावणारी रेल्वे सुरू झाली आहे. कोल्हापुरातून सकाळी ६:१० वाजता सुटून मिरजेत ७:३० वाजता येते. पंढरपूरला दुपारी १२:१५ वाजता, सोलापुरात २:३० वाजता, अक्कलकोटला ३ वाजता पोहोचते. गाणगापुरात पावणेचार वाजता जाते. कलबुर्गीमध्ये दुपारी सव्वा चार वाजता जाते.
परतीच्या प्रवासात हीच गाडी कलबुर्गीतून सायंकाळी ६:१० वाजता सुटून गाणगापुरात साडेसहा वाजता, अक्कलकोटमध्ये ७:१० वाजता, सोलापुरात रात्री साडेआठ वाजता, पंढरपुरात रात्री सव्वा अकरा वाजता, मिरजेत पहाटे तीन वाजता व कोल्हापुरात पहाटे पावणेसहा वाजता पोहोचते.
या गाडीने मिरजेतून थेट अक्कलकोट किंवा गाणगापूरला गेल्यानंतर देवदर्शन करून मुक्काम करता येतो. दोन्ही ठिकाणी भक्त निवासांची सोय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कलबुर्गी-कोल्हापूर ही एक्स्प्रेस गाणगापुरात सकाळी सात वाजता, तर अक्कलकोटमध्ये सकाळी पावणेआठ वाजता येते. या गाडीने पंढरपूरला परतीच्या प्रवासाला येता येते. पंढरपुरात देवदर्शन करून दुपारी दोन वाजताच्या परळी-मिरज पॅसेंजरने मिरजेला परतता येते.
स्वस्तात मस्त प्रवास
यानिमित्ताने एकाच मुक्कामात गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर या तीर्थस्थळांना जाणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे जाता-येता अवघ्या हजारभर रुपयांच्या खर्चात हे देवदर्शन शक्य आहे. दिवाळीत पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांसाठी ही नवी गाडी फायद्याची व सोयीची ठरणार आहे.
सकाळी कोल्हापुरातून सुटणारी ही गाडी कलबुर्गीपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते. प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अक्कलकोट, गाणगापूरसह धार्मिक स्थळांचे थांबेही मंजूर झाले आहेत. स्वस्त व थेट प्रवासाचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. - किशोर भोरावत, सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती