Sangli Crime: धक्कादायक! आठ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाचा बलात्कार, नराधमास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:23 IST2025-03-17T14:23:37+5:302025-03-17T14:23:55+5:30
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी ...

Sangli Crime: धक्कादायक! आठ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाचा बलात्कार, नराधमास अटक
सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सुभाष ऊर्फ भय्या गोविंद कांबळे या नराधमास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. पीडितेच्या आजीने याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीला मिरज तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतलेले आहे. पीडित मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. संशयित कांबळे हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. दि. २६ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी अंगणात खेळताना दिसली. संशयित कांबळे याने तिला गोड बोलून घरात बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
पीडिता मुलगी घरी गेली. तिला त्रास जाणवू लागल्याने रडू लागली. नातेवाइकांनी तिच्यावर घरगुती उपचार केले. परंतु, तिला जास्तच त्रास होऊ लागला. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची विचारपूस करून वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या आजीने तक्रार दिली. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी तातडीने नराधम कांबळे याला अटक करण्याचे आदेश दिले. कांबळे याच्याविरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे अधिक तपास करत आहेत.
जिल्ह्यात खळबळ
जत तालुक्यात काही दिवसांपूर्वी नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केल्यामुळे लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.