Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:14 IST2026-01-12T15:12:14+5:302026-01-12T15:14:07+5:30
आमदार इद्रिस नायकवडी व अभिजीत हारगे गटात जोरदार वाद

Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
मिरज : महापालिका निवडणुकीच्या मतदानास दोन दिवस शिल्लक असताना मिरजेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी दुपारी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या निवासस्थानाजवळ पैसे वाटपाच्या संशयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार अभिजीत हारगे व अजितदादा गटाचे आमदार नायकवडी गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. दोन्ही गटांचे समर्थक जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवला.
प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे व अजितदादा गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी यांच्यात लढत आहे. सोमवारी दुपारी आमदार नायकवडी यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमलेली पाहून अभिजीत हारगे तेथे गेले. त्या ठिकाणी मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत हारगे यांनी निवडणूक आयोगाच्या फिरत्या पथकाकडे व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली.
या तक्रारीनंतर आमदार नायकवडी व श्वेतपद्म कांबळे यांचे कार्यकर्ते अभिजीत हारगे यांच्या अंगावर धावून आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आल्याने वादावादी व धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पोलिस उपअधीक्षक प्राणिल गिलडा यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
मतदारांना पैसे वाटप करण्यास आक्षेप घेतल्याने आमदार इद्रिस नायकवडी, त्यांचे कार्यकर्ते तसेच अंगरक्षक माझ्या अंगावर धावून आले. पोलिस बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू होते, असा आरोप अभिजीत हारगे यांनी केला. तसेच याबाबत तक्रारी ची दखल घेण्यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी व प्रशासनातील कोणताही अधिकारी घटनास्थळी आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
..त्यामुळे मतदार आमच्याकडे येतात - नायकवडी
आमच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. प्रत्येक घरापर्यंत आमचा मतदारांची थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही. निवडणुकीमध्ये मतदार यादीत बराच घोळ आहे. मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागामध्ये आहे हे त्यांना समजत नाही त्यासाठी ते आमच्याकडे येतात. आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात. मात्र विरोधी उमेदवारानी आमच्या घरासमोर येऊन दमदाटी केल्याचा दावा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला.