इस्लामपुरात सराईत गुंडाच्या टोळीकडून युवकाचा खून; हल्लेखोरांचा पळून जाण्याचा प्रयत्न, झटापटीत पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:36 IST2025-01-29T18:36:08+5:302025-01-29T18:36:34+5:30
तीन तासांत संशयिताच्या मुसक्या आवळल्या

इस्लामपुरात सराईत गुंडाच्या टोळीकडून युवकाचा खून; हल्लेखोरांचा पळून जाण्याचा प्रयत्न, झटापटीत पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात यापूर्वी दोन खून आणि प्राणघातक हल्ले करत दहशत माजवणाऱ्या सौरभ पाटील या सराईत गुंडाने दोन साथीदारांना सोबत घेत सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आणखी एका २४ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना यल्लमा चौकातील भर वसाहतीमध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या संशयितांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
गौरव हेमंत कुलकर्णी (वय २४, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत हेमंत नारायण कुलकर्णी (वय ५४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून या खूनप्रकरणी पोलिसांनी सौरभ सुशील पाटील (रा. यल्लमा चौक, इस्लामपूर), साजीद जहाँगीर इनामदार (गोटखिंडी, ता. वाळवा) आणि विजय ऊर्फ सोन्या धुलुगडे (रा. इस्लामपूर), अशा तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
गौरव कुलकर्णी याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी तो त्याचा मित्र जुबेर मुजावर याच्यासोबत दुचाकीवरून कापूसखेडनाका परिसरात फिरत होता. त्यावेळी मुख्य संशयित सौरभ पाटील याने त्याला जुबेरबरोबर का फिरतोस? असे म्हणत तुला जिवंत सोडत नाही, अशी धमकी दिली होती. सोमवारी रात्री सौरभने पुन्हा गौरव याला यल्लमा चौकात येण्यास सांगितले होते. त्यामुळे गौरव कुलकर्णी हा त्याच्या दुचाकीवरून सोमवारी रात्री आला होता.
त्यावेळी साजीद व विजय या दोघांनी गौरव कुलकर्णी याला धरून ठेवले. त्याचवेळी सौरभ पाटील याने चाकूने वार करत गौरवचा खून केल्याचा ठपका त्याच्या वडिलांनी फिर्यादित ठेवला आहे. या घटनेनंतर तिघाही हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले, तर रक्तबंबाळ होऊन पडलेल्या गौरवला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वर्मी वार बसून अतिरक्तस्राव झाल्याने गौरवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
कारवाईत पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोर कामेरीच्या दिशेने निघाल्याचा माग काढत त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी संशयित हल्लेखोर एका शेताच्या बाजूला उभे होते. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच हल्लेखोरांनी पोलिसांशी झटापट करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, हवालदार अमोल सावंत यांना किरकोळ दुखापत झाली. याचवेळी पथकाने या तिघांना जेरबंद केले.