Sangli: सासूच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; नवविवाहितेने संपविले जीवन, पाचजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:09 IST2025-10-07T12:08:54+5:302025-10-07T12:09:15+5:30
अवघ्या ११ महिन्यांत प्रेमविवाहाचा शेवट

Sangli: सासूच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; नवविवाहितेने संपविले जीवन, पाचजणांवर गुन्हा
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सासूच्या उपचारासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावल्याने तिने हे पाऊल उचलले. याप्रकरणी सासरच्या पाचजणांविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त करण्यासह हुंडाबळीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमृता ऋषीकेश गुरव असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. ११ महिन्यांपूर्वी तिचा ऋषीकेश गुरव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी वंदना अनिल कोले (रा. रेठरेहरणाक्ष) यांनी मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती ऋषीकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. इस्लामपूर) आणि पतीचा मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा.वडणगे, जि. कोल्हापूर) अशा पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
छळाला कंटाळून अमृताने ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर इस्लामपूर आणि कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
मानसिक व शारीरिक जाचहाट
लग्नानंतर कर्करोगाने त्रस्त असलेल्या सासूवर उपचार करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत या कारणावरून मृत अमृता हिला वरील पाचजणांकडून शिवीगाळ करत मानसिक व शारीरिक जाचहाट केला जात होता. तसेच तू आमच्या जातीची नाहीस. त्यामुळे घरातून निघून जा, असे वारंवार सांगत हिचा अपमान केला जात होता.