Sangli Crime: कौटुंबिक वादातून वडिलांसह नवविवाहित तरुणाने संपविले जीवन, गावात तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:27 IST2025-07-05T18:26:19+5:302025-07-05T18:27:40+5:30
नेमक्या कारणाचा शोध

Sangli Crime: कौटुंबिक वादातून वडिलांसह नवविवाहित तरुणाने संपविले जीवन, गावात तर्कवितर्क
मिरज : सोनी (ता. मिरज) येथे कौटुंबिक वादातून बापाने आत्महत्या केल्यानंतर पाठोपाठ नवविवाहित मुलानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश हिंदुराव कांबळे (वय ५०) व मुलगा इंद्रजित गणेश कांबळे (२२, रा. सोनी, ता. मिरज) अशी मृत बापलेकांची नावे आहेत.
सोनी येथील द्राक्ष बागायतदार गणेश कांबळे यांचा एकुलता एक मुलगा इंद्रजित याचा गेल्या महिन्यात विवाह झाला होता. मात्र महिन्याभरापासून घरात कौटुंबिक वाद सुरु होते. वाद विकोपाला जाऊन गणेश यांनी शुक्रवारी सकाळी द्राक्षबागेत जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. थोड्या वेळाने तेथे इंद्रजित पोहोचला. वडिलांनी आत्महत्या केल्याचे त्याच्या निदर्शनास आले. इंद्रजित याने वडिलांच्या आत्महत्येची माहिती सर्वांना दिली व मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेस पाचारण केले.
रुग्णवाहिका आल्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईक गणेश कांबळे यांचा मृतदेह उचलत असताना इंद्रजित यानेही द्राक्षबागेच्या शेडमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केले. औषध प्यायल्याने इंद्रजित याचाही लगेचच मृत्यू झाला. बापलेकाचा मृतदेह एकाच वेळी मिरज शासकीय रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे सोनी गावावर शोककळा पसरली होती.
ही घटना समजताच पोलिस उपअधीक्षक प्राणिल गिल्डा, निरीक्षक अजित सिद यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले.
आत्महत्येबाबत गावात तर्कवितर्क
गणेश कांबळे यांची अडीच एकर द्राक्षबाग असून गावात तीनमजली घर आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांनी चारचाकी वाहन घेतले होते. गणेश कांबळे यांना इंद्रजित हा मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. परिस्थिती सधन असल्याने इंद्रजित याचा विवाहसुद्धा चांगल्या पद्धतीने झाला होता. चार दिवसांपूर्वीच इंद्रजित याची नववधू माहेरी जाऊन सासरी परतली होती. अशातच कौटुंबिक वाद सुरू झाल्याची अशी चर्चा होती.
नेमक्या कारणाचा शोध
पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. रात्री उशिरापर्यंत आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.