Sangli: प्राण्याचे पाय, काळ्या बाहुल्या अन् पिना टोचलेले लिंबू; इस्लामपुरात एका घरासमोर जादूटोणा, करणीचा अघोरी प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:26 IST2025-03-28T13:25:15+5:302025-03-28T13:26:34+5:30
परिसरात भीतीचे वातावरण पसरले

Sangli: प्राण्याचे पाय, काळ्या बाहुल्या अन् पिना टोचलेले लिंबू; इस्लामपुरात एका घरासमोर जादूटोणा, करणीचा अघोरी प्रकार
इस्लामपूर : येथील उरूण परिसरातील महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार केल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबीयांचे, नागरिकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांत तयार झालेली भीती दूर केली.
उरूण भागात महिलेच्या दारात अज्ञाताने पहाटेच्या दरम्यान दारातच जादूटोणा आणि करणीचे साहित्य ठेवल्याचे दिसून आले. त्यांच्या दरवाजाबाहेर प्राण्याचे पाय लटकविलेले होते. त्यावर लिंबू सुया पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळ्या बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. २१ लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही पिना टोचलेले समोर ठेवलेले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची फांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी-कुंकू, गुलाल टाकलेला होता.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला. काही वेळातच घटनास्थळी पोलिस आले. संजय बनसोडे यांनी कुटुंबीयांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगितले, त्यांचे प्रबोधन केले. सदर घटनेची तक्रार घरातील महिलेने पोलिसांकडे केली आहे.