Sangli Municipal Election 2026: उमेदवारीवरून भाजपमधील संघर्ष उफाळला, मुंबईतील बैठकीत दोन गटात वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:55 IST2025-12-27T13:54:23+5:302025-12-27T13:55:03+5:30
नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यावरुन राजकारण तापले

Sangli Municipal Election 2026: उमेदवारीवरून भाजपमधील संघर्ष उफाळला, मुंबईतील बैठकीत दोन गटात वाद
सांगली : भाजपच्या कोअर कमिटीच्या मुंबईत गुरुवारी रात्री पार पडलेल्या बैठकीत उमेदवारी देण्यावरून दोन गटात संघर्षाची ठिणगी पडली. नव्याने पक्षात आलेल्यांना तिकीट देण्यावरून वाद निर्माण झाल्याचे समजते. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली पाहिजे, अशी भूमिका एका गटाने घेतली, तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलीच पाहिजे, अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली. त्यामुळे या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.
उमेदवारीचा हा पेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत आता येत्या दोन दिवसांत याविषयी तोडगा काढला जाणार आहे.
भाजपच्या संभाव्य उमेदवारांची एक यादी गुरुवारी रात्री बनवण्यात आली होती, मात्र त्यात बदल केल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. अद्याप एकही अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसला तरी प्रभाग क्रमांक १४ व अन्य काही ठिकाणच्या इच्छुकांनी उमेदवारी मिळाल्याचे सांगत प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे गोंधळात आणखीन भर पडली आहे.
स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित होत नसल्याने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्याआधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उमेदवार ठरविण्यावरून कोअर कमिटीच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समजते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या व पक्षातील मूळ नेत्यांच्या संमर्थकांना उमेदवारी देण्यावरून बैठकीत वादंग झाल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपच्या जुन्या एका गटाने या उमेदवारीला विरोध केला तर एका गटाने त्यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याचे सांगत उमेदवारीसाठी आग्रह धरला.
मेरिटवर उमेदवारी देण्याचा फैसला
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही पक्षीय बैठकीत मेरीटचा उल्लेख केला होता. मुंबईच्या बैठकीतही त्यांनी पुनरुच्चार करीत ज्याचे मेरीट चांगले मग तो कोणीही असला तरी त्याला उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, काही नेत्यांनी निष्ठावंतांचा तसेच उमेदवारी देण्याविषयी दिलेल्या शब्दाचा उल्लेख केल्याने संघर्ष निर्माण झाला.
अनेक माजी नगरसेवकांचा पत्ता कट
सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १३ म्हणजेच गावभाग हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या काही वर्षापासून येथून भाजपचे नगरसेवक निवडून येत आहेत. येथील चारही माजी नगरसेवक भाजपचेच आहेत. मात्र आता भाजपने गावभागासह शहरातील अन्य काही प्रभागात माजी नगरसेवकांचा पत्ता कट केल्याचे समजते. काही उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याला भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.