सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत २९.६५ टक्के मतदान; शांघायमधून येऊन 'तसनीम'ने बजावला मतदानाचा हक्क
By अशोक डोंबाळे | Updated: May 7, 2024 14:14 IST2024-05-07T14:13:30+5:302024-05-07T14:14:16+5:30
उन्हामुळे काही मतदान केंद्रे ओस

सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंत २९.६५ टक्के मतदान; शांघायमधून येऊन 'तसनीम'ने बजावला मतदानाचा हक्क
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले आहे. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या २९.६५ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रावर नवमतदार, ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसत आहे; पण दुपारी १२ वाजल्यापासून काही मतदान केंद्रे उन्हामुळे ओस पडलेली दिसत आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मतदारसंघात सरासरी २९.६५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. साडेनऊनंतर मतदानात मोठी वाढ झाली आहे. सध्या कुपवार, सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाने मतदान होत आहे.
शांघायमधून येऊन तसनीमने बजावला मतदानाचा हक्क
अडीच महिन्याच्या जुळ्या मुलासह तसनीम कालेकर (शांघाय, चीन) येथून खास मतदान करण्यासाठी आल्या आहेत. त्यांनी पलुस येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसनीमचा आदेश घेऊन शहरातील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील का? अशी मतदान केंद्रावर चर्चा होती.
सांगली लोकसभेसाठी दुपारी १ वाजेपर्यंतचे मतदान
विधानसभा मतदारसंघ मताची टक्केवारी
- जत २९.५५
- खानापूर २७.८४
- मिरज ३१.७०
- पलुस -कडेगाव २६.८०
- सांगली ३२.९६
- तासगाव -कवठेमहांकाळ २८.५४