Viral News : सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक हल्ली नको नको ते कारनामे रेकॉर्ड करायला लागले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, लोकांना त्रास अशा कितीतरी घटना नेहमीच समोर येत असतात. फ्रान्समधील एका १८ वर्षीय तरूणावर खोडकरपणा केल्याचं चांगलंच महागात पडलं आहे. सिंगापूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरूणावर तुरुंगवासाची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्याने ऑरेंज ज्यूस वेंडिंग मशीनमधील स्ट्रॉ चाटून पुन्हा मशीनमध्ये ठेवला होता. Didier Gaspard Owen Maximilien या तरुणावर खोडकरपणा आणि जनतेला त्रासदायक कृत्य असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, त्याने वेंडिंग मशीनमधील स्ट्रॉ चाटली आणि ती पुन्हा मशीनमध्ये ठेवली. इतकंच नाही त्याने हा प्रकार व्हिडिओत शूट केला आणि इन्स्टाग्रामवर पोस्टही केला. त्याने व्हिडिओला “city is not safe” असं कॅप्शन दिल्याचं सांगितलं जात आहे.
कंपनीने काय केलं?
ही मशीन iJooz या कंपनीची होती. कंपनीने सांगितले की घटनेनंतर मशीनमधील 500 स्ट्रॉ बदलण्यात आल्या तसेच स्वच्छता आणि तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली.
जर तरूणावर ठेवण्यात आलेले दोन्ही आरोप सिद्ध झाले तर त्याला २ वर्षाहून अधिक तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. इतकंत नाही तर हजारो डॉलर दंडही भरावा लागू शकतो. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे.
