अलीकडे एका क्रिकेट मॅचदरम्यान प्रिती झिंटा हिने घातलेल्या एका टोपीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. साधा ड्रेस, गोड स्मित आणि डोक्यावर रंगीत टोपी असा तिचा लूक खूपच आकर्षक दिसत होता. प्रिती अनेकदा असे पारंपरिक पेहराव करताना दिसत असते. पंजाबी ड्रेस असो किंवा पहाडी शाल कायम चर्चेत येतच असते. (IPL 2026: Preity Zinta wears a special colorful Himachali cap , her look goes viral )सोशल मीडियावरही तिच्या या पारंपरिक रुपाचं कौतुक अर्थातच होतं. पण यावेळी ज्या टोपीची एवढी दखल घेतली जात आहे की नक्की आहे तरी काय? दिसायला फारच आकर्षक असलेली ही टोपी हिमाचल टोपी आहे, जिला हिमाचल कॅप असं म्हटलं जातं.
हिमाचली टोपी ही हिमाचल प्रदेशाच्या संस्कृतीची खास ओळख मानली जाते. थंड प्रदेश असल्यामुळे सुरुवातीला डोके उबदार ठेवण्यासाठी लोक अशा प्रकारच्या लोकरीच्या टोप्या वापरत असत. मात्र काळानुसार या टोपीला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. आज ही टोपी फक्त थंडीपासून बचावासाठी नसून हिमाचलच्या परंपरेचे प्रतीक मानली जाते.
या टोपीची खास ओळख म्हणजे तिचा गोल आकार आणि समोर असलेली रंगीत पट्टी. हिरवा, लाल किंवा बहुरंगी काठ असलेल्या टोप्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हिमाचलमधील वेगवेगळ्या भागांनुसार टोपीचे डिझाइन बदलते. कुल्लू टोपी हा त्यातील सर्वात प्रसिद्ध प्रकार मानला जातो. त्यावर पारंपरिक विणकाम आणि आकर्षक डिझाइन केलेले असते.
इतिहास पाहिला तर हिमालयीन भागातील लोकांनी थंडीपासून संरक्षणासाठी अशा टोप्यांचा वापर सुरू केला होता. नंतर स्थानिक हस्तकला, विणकाम आणि परंपरा यांचा टोपीच्या बनावटीशी सुंदर संगम झाला. त्यामुळे ही टोपी हिमाचलच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग झाली. पूर्वी राजघराण्यातील लोक आणि स्थानिक नेतेही अशा टोप्या घालत असत. आजही वापरतात.
हिमाचलमध्ये सण, लग्न, धार्मिक कार्यक्रम किंवा खास समारंभांमध्ये हिमाचली टोपी घालण्याला विशेष महत्त्व आहे. एखाद्या पाहुण्याचा सन्मान करण्यासाठीही ही टोपी भेट दिली जाते. त्यामुळे ती आदराचे प्रतीक मानली जाते.
प्रिती झिंटा स्वतः हिमाचल प्रदेशाशी जोडलेली असल्यामुळे ती अनेकदा आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अभिमानाने उल्लेख करताना दिसते. तिच्या या साध्या पण सुंदर लूकमुळे हिमाचली टोपी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पारंपरिक गोष्टी आधुनिक स्टाइलमध्येही किती सुंदर दिसू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
