उन्हाळ्यात घाम जास्त येणे, सतत तहान लागणे, अशक्तपणा जाणवणे किंवा प्रचंड थकवा येणे या त्रासांसाठी अनेकजण इलेक्ट्रोल किंवा ओआरएस पिण्याचा पर्याय निवडतात. उष्णतेमुळे शरीरातून भरपूर पाणी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेले क्षार जास्त प्रमाणात बाहेर पडतात. (Summer healthcare tips : electral or ORS for good health, should we drink it ? how much is good ?)अशावेळी शरीरातील पाण्याचे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रोल उपयोगी ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा वापर वाढलेला दिसतो.
इलेक्ट्रोलमध्ये सोडियम, पोटॅशियम, ग्लुकोज यांसारखे घटक असतात. हे घटक शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. उन्हामुळे होणारी डिहायड्रेशनची समस्या कमी करण्यासाठी डॉक्टरही काही वेळा ओआरएस पिण्याचा सल्ला देतात. विशेषतः उलट्या, जुलाब, जास्त घाम येणे किंवा उन्हात जास्त वेळ काम करावे लागल्यास ते फायदेशीर ठरू शकते.
मात्र प्रत्येकाने रोजच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोल पिणे योग्य नसते. अनेकांना ते साध्या पाण्याऐवजी सतत पिण्याची सवय लागते, पण गरज नसताना जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील मीठ आणि साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे काही दुष्परिणाम जाणवू शकतात. सतत इलेक्ट्रोल प्यायल्याने काही वेळा शरीराला सूज येणे, पोट फुगणे किंवा रक्तदाब वाढण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामध्ये असणारे सोडियम जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास हृदय आणि किडनीवर ताण येऊ शकतो. डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी तर अधिक काळजी घेणे गरजेचे असते कारण काही इलेक्ट्रोल पावडरमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार इलेक्ट्रोल देणे टाळावे. साधी तहान लागली म्हणून सतत इलेक्ट्रोल पिण्याची गरज नसते. शरीराला पुरेसे पाणी, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी यांसारखी नैसर्गिक पेयेही चांगला पर्याय ठरू शकतात. सामान्यतः शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्यास किंवा जुलाब-उलट्यांसारखी समस्या असल्यास मर्यादित प्रमाणात इलेक्ट्रोल घेणे योग्य ठरते. व्यायाम, खेळ अशा जास्त थकवणाऱ्या कृती करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रोल जास्त गरजेचे असते.
