निपाह व्हायरसचे पश्चिम बंगालमध्ये दोन रुग्ण समोर आले आहेत. थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि पाकिस्तानच्या विमानतळावर कोरोनासारखं स्क्रीनिंग सुरू करण्यात आलं आहे. भारत सरकारने यावर पावलं उचलली आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १९६ लोकांची तपासणी केली असता, सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा प्रसार सध्या नियंत्रित असून कोणताही 'कम्युनिटी ट्रान्समिशन'चा धोका नाही.
निपाह व्हायरसचा इतिहास
निपाह व्हायरस पहिल्यांदा १९९८ मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुकरांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आढळला होता. केरळमध्ये २०१८ पासून अनेकदा याचे रुग्ण आढळले आहेत (२०२५ मध्ये ४ रुग्ण). पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी २००७ मध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता. या आजाराचा मृत्यूदर ४०% ते ७५% इतका जास्त असतो, म्हणूनच WHO याला 'प्रायोरिटी पॅथोजेन' मानतं.
व्हायरस कसा पसरतो?
हा व्हायरस प्रामुख्याने 'फ्रूट बॅट्स' (फळं खाणारे वटवाघूळ) यांच्याद्वारे पसरतो. वटवाघळांची लाळ, लघवी किंवा विष्ठेने दूषित झालेली फळे किंवा खजुराचा रस पिल्याने/खाल्ल्याने होतो. रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आल्यास (थुंकी, रक्त किंवा लघवीद्वारे). विशेषतः श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांकडून प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.
संकटं संपता संपेना! ना लस, ना खात्रीशीर उपचार... निपाह व्हायरस किती धोकादायक, कसा होतो प्रसार?
लक्षणं किती गंभीर असू शकतात?
सुरुवातीची लक्षणे - खूप ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणं, घसा खवखवणं, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणं.
गंभीर लक्षणं - चक्कर येणं, गोंधळलेली अवस्था, फिट्स येणं आणि मेंदूला सूज येणे (Encephalitis). यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो.
बचावलेल्या रुग्णांपैकी २०% जणांना दीर्घकाळ न्यूरोलॉजिकल समस्या जाणवू शकतात.
उपचार आणि संशोधन
सध्या यावर कोणतीही अधिकृत लस किंवा विशिष्ट औषध उपलब्ध नाही. उपचार प्रामुख्याने लक्षणांवर आधारित असतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सध्या बांगलादेशात लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करत आहे.
बचावासाठी काय करावं?
फळं निवडून खा - फळं नीट धुवून आणि साल काढूनच खा. जमिनीवर पडलेली किंवा अर्धवट कुरतडलेली फळं खाऊ नका.
पेय पदार्थांची काळजी - कच्चा खजुराचा रस पिणं टाळा, विशेषतः वटवाघूळ असलेल्या भागात.
स्वच्छता - हात साबणाने वारंवार धुवा.
संपर्क टाळा - आजारी डुकरं किंवा वटवाघळांपासून दूर राहा. रुग्णाची काळजी घेताना मास्क आणि हातमोजे (PPE) वापरा.
प्रवास - विमानतळांवरील स्क्रीनिंग प्रक्रियेला सहकार्य करा. (थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया यांसारख्या देशांत स्क्रीनिंग सुरू आहे).
जर तुम्हाला ताप, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
