उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. कडक ऊन, शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा आणि उष्णतेचा परिणाम यामुळे डोके दुखू लागते. हा त्रास साधा वाटला तरी दुर्लक्ष केल्यास तो वाढू शकतो, त्यामुळे योग्य वेळी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (Home remedies to cure headaches caused by heat, see what to do and what to avoid....)एकदा उन्हामुळे डोकं दुखायला लागलं की ते दिवसभर त्रास देतं. त्यामुळे उपाय - उपचार करणं गरजेचं आहे.
सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे शरीर हायड्रेट ठेवणे. उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डोकेदुखी वाढते. दिवसातून पुरेसे पाणी प्या. यासोबतच लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखी पेयं घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
तापमान खूप जास्त असताना थेट उन्हात जाणे टाळावे. शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळा. बाहेर जावे लागल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा. यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम कमी होतो आणि डोकेदुखीपासून बचाव होतो.
डोकं दुखत असेल तर थंड पाण्याने चेहरा धुणे किंवा कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवणे खूप उपयोगी ठरते. काही वेळ शांत, थंड जागेत विश्रांती घेतल्यासही आराम मिळतो. एसी किंवा पंख्याखाली बसताना खूप थंडावा घेणे टाळावे, कारण अचानक तापमान बदलामुळे त्रास वाढू शकतो. आहारातही हलके आणि पचायला सोपे पदार्थ घ्यावेत. जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. फळे, सॅलड, ताक यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.
झोपेची कमतरता देखील डोकेदुखीचे एक कारण ठरु शकते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. शरीर आणि मनाला विश्रांती मिळाल्यास डोकेदुखी कमी होते. जर डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा खूप तीव्र असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते, कारण कधी कधी ही लक्षणे इतर गंभीर कारणांमुळेही असू शकतात. योग्य काळजी, संतुलित आहार आणि साध्या सवयींमुळे उन्हामुळे होणारी डोकेदुखी सहज टाळता येते. स्वतःची काळजी घेतल्यास उन्हाळाही आरामदायी आणि सुखद जाऊ शकतो.
