उच्च रक्तदाब म्हणजेच बीपीचा त्रास आता फक्त वयोवृद्धांमध्येच नाही, तर तरुणांमध्येही वाढताना दिसतो. धावपळीचे जीवन, असंतुलित आहार, झोपेची कमतरता आणि सततचा मानसिक ताण ही त्यामागची मुख्य कारणे असली तरी एक बाब अनेकदा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे चिडचिड आणि राग. हो, मनावर ताबा नसेल राग पटकन उफाळून येत असेल, तर बीपी नियंत्रणात ठेवणं खूप कठीण होऊन बसतं.
राग हा नुसता एक भाव नाही तर तो शरीरावरही फार परिणाम करतो. राग आला की शरीरात 'स्ट्रेस हार्मोन्स' जसे की अॅड्रेनालिन आणि कोर्टिसोल झपाट्याने वाढतात. यामुळे हृदयाची गती वाढते, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि परिणामी रक्तदाब झपाट्याने वाढतो.(Anger issues ? see health related reasons behind it, healthcare tips ) वारंवार राग येत असेल, तर हा उच्च रक्तदाब सतत त्रास देतो. त्यामुळेच रागावर नियंत्रण ठेवणे ही बीपीच्या दृष्टीनेही महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त व्यक्तिमत्वातील सुधारणा नसून, ती आरोग्यासाठी गरजेची गोष्ट आहे.
चिडचिड सतत होत असेल तर त्याची कारणे शोधा, त्यावर उपाय शोधा. सतत होणारी चिडचिड मानसिक थकवा निर्माण करते. घरगुती अडचणी, कामाचा ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे ही चिडचिड वाढत जाते. त्यातून निर्माण होणारा असंतुलित भावनिक ताण हृदयावरही दाब निर्माण करतो. त्यामुळे चिडचिड कमी करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे फक्त मन शांत ठेवण्यासाठी नाही तर रक्तदाबासाठी एक प्रकारचा उपचारच आहे.
या सगळ्यावर उपाय म्हणून ध्यान करणे गरजेचे आहे. तसेच श्वसनाचे व्यायाम, योग आणि योग्य आहार घेणे गरजेचे ठरते. दररोज फक्त दहा मिनिटे डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित केल्याने मन स्थिर होतं. विचारांचा वेग कमी होतो आणि रागावर हळूहळू ताबा मिळवता येतो. तसेच झोप पूर्ण न झाल्यास अधिक चिडचिड होते. झोप महत्त्वाची असते अजिबात टाळू नका. पुरेशी विश्रांती घेणे हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.
सतत रागावणं आणि चिडचिड करणं हे काही फक्त स्वभावातील गुण नाहीत. तर ते एक लक्षण आहे. बीपीचा त्रास होत असेल, तर औषधांबरोबरच आपली मानसिक अवस्था, विशेषतः राग, चिडचिड यावर लक्ष देणं आवश्यक आहे. बीपी वर खाली झाल्यावर चिडचिड होते. ते अगदीच स्वाभाविक आहे. त्यामुळे लक्षणे ओळखा. बीपीचा त्रास असेल तर कमी करण्यासाठी आणि नसेल तर भविष्यात होऊ नये यासाठी रागावर नियंत्रण ठेवणेही महत्त्वाचे आहे.
