उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की वेध लागतात ते गावी किंवा फिरायला जाण्याचे... उन्हाळ्याची सुट्टी लागली की अनेकजण काही दिवसांसाठी गावी किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. मात्र घर बंद करून बाहेर पडताना एक मोठी चिंता अनेकांना सतावत राहते, ती म्हणजे घरातील किंवा बाल्कनीतील रोपांची. आपण नसताना या रोपांना पाणी कोण घालणार? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच पडतो. विशेषतः उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे रोपांना योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळालं नाही, तर ती पटकन कोमेजू शकतात किंवा मरूही शकतात. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी रोपांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं(how to prevent plants from drying out in summer).
वाढता उन्हाळा फक्त आपल्यालाच नाही तर झाडं, रोपांनाही नकोसा होतो. घराला कुलूप लावून बाहेर जाताना रोपांच्या पाण्याची सोय करणे हे एक मोठे अवघड काम असते. शेजाऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा काही नैसर्गिक आणि स्वस्त घरगुती उपाय करून आपण आपल्या रोपांची अगदी उत्तमरित्या काळजी घेऊ शकता. खरंतरं, काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स (vacation plant watering tips) वापरून आपण काही दिवस घराबाहेर असलात तरी रोपांसाठी मातीत ओलावा टिकवून ठेवता येऊ शकतो. सुट्टीत गावाला किंवा फिरायला गेल्यानंतर बागेतील रोप , झाडं उन्हाळ्यात मरू नयेत म्हणून नेमकी (indoor plants care during vacation) कोणती खबरदारी घ्यावी ते पाहा.
गावी किंवा फिरायला जाताना झाडांना पाणी देण्यासाठी काही 'देसी जुगाडू' पाहूयात...
१. बाटलीचा 'ड्रिप' जुगाड :- एका प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीच्या टोपणला सुईने छोटे छिद्र पाडा. ही बाटली पाण्याने भरून झाडाच्या कुंडीत उलटी रोवून ठेवा. यामुळे थेंब थेंब पाणी झाडाच्या मुळांना मिळत राहील आणि मातीतील ओलावा टिकून राहील.
२. सुती दोरी किंवा वातीचा वापर :- एक बादली पाण्याने भरून उंचावर ठेवा आणि त्या शेजारी झाडांच्या कुंड्या ठेवा. आता एक लांब सुती दोरी घ्या, जिचे एक टोक बादलीच्या तळाशी असेल आणि दुसरे टोक झाडाच्या कुंडीतील मातीत खोलवर रोवून ठेवा. 'कॅपिलरी ॲक्शन'मुळे बादलीतील पाणी हळूहळू दोरीवाटे झाडाला मिळत राहील.
३. मल्चिंग करा :- झाडाच्या कुंडीतील मातीवर पालापाचोळा, वाळलेले गवत किंवा नारळाच्या शेंड्यांचा थर द्या. यामुळे सूर्याच्या उष्णतेने मातीतील पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत नाही आणि ओलावा दीर्घकाळ टिकतो.
४. कुंड्या एकत्र सावलीत ठेवा :- शक्य असल्यास बाहेरील सर्व कुंड्या एकत्र करून सावलीच्या ठिकाणी ठेवा. कुंड्या एकमेकांच्या जवळ ठेवल्याने तिथे आर्द्रता टिकून राहते आणि झाडे लवकर सुकत नाहीत.
५. 'वॉटर ट्रे' पद्धत :- कुंडीच्या खाली एक मोठी प्लेट किंवा ट्रे ठेवा आणि त्यात थोडे पाणी भरून ठेवा. झाड त्याच्या गरजेनुसार खालून पाणी शोषून घेईल. (मात्र, खूप दिवस पाणी साचून राहून डास होऊ नयेत याची काळजी घ्या).
६. हायड्रोजेल बॉल्स :- बाजारात मिळणारे वॉटर जेल किंवा हायड्रोजेल बॉल्स मातीत मिसळल्यास ते पाणी धरून ठेवतात आणि झाडांना हळूहळू पाणी पुरवतात.
७. मातीवर ओलसर कापड किंवा मल्चिंग करा :- रोपांच्या मातीवर ओलसर वर्तमानपत्र, नारळाच्या शेंड्या किंवा कोरडी पानं ठेवल्यास मातीतील ओलावा जास्त वेळ टिकून राहण्यास मदत मिळते.
८. कुंड्यांभोवती ओल्या कपड्याची ट्रिक :- जर कुंड्या मातीच्या असतील तर या मातीच्या कुंड्यांच्या बाहेरून ओला कपडा गुंडाळून ठेवा यामुळे मातीच्या कुंड्यांमध्ये ओलावा राहतो आणि रोप सुकत नाही.
